नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे मंत्रालय रेल्वे स्टेशनच्या आधारभूत संरचनेत बदल करण्याच्या येत असून, सुविधांमध्येही वाढ करणार आहे. यातीलच एक भाग म्हणून रेल्वे प्रवाशांना आता रेल्वे तिकीट 5 मिनीटांत मिळण्याची यंत्रणा कार्यन्वित करण्यात येत आहे. यासाठी देशातील सर्व रेल्वे स्टेशनसाठी सिटिझन चार्टर बनवण्यात आला आहे. यावर सर्व रेल्वे स्टेशनना हा सिटिझन चार्ट रेल्वेच्या वेबसाइटवर 15 ऑगस्टपूर्वी अपडेट करण्याच्या सुचना देण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
रेल्वे आरक्षणासाठी एक निश्चित कालावधी ठरवण्यात येत आहे. यासाठी रेल्वेच्या आधारभूत संरचनेमध्ये काही मुलभूत बदल करण्यात येत आहेत. ज्यामुळे रेल्वे प्रवाशांनी तिकीट पाच मिनीटांत उपलब्ध होऊ शकणार आहे.
रेल्वे मंत्रालायाच्या वतीने बनवण्यात आलेल्या सुचनात्मक चार्टरनुसार, ए1 आणि ए श्रेणी रेल्वे स्टेशनच्या रेल्वे अधिकाऱ्यांना रेल्वे प्रवाशांच्या समस्यांचे पाच मिनीटांत निवारण करण्याच्य सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच ऑन बोर्ड हाउसकीपिंग सर्व्हिसेस (ओबीएचएस) ला 20 मिनीटांच्या आत समस्यांचे निवारण करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच रेल्वेच्या सर्व सेवांसाठीही कालावधी निश्चित करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तर महिलांच्या सुरक्षेसाठी 1000 रेल्वे स्टेशनवर सीसीटिव्ही बसवण्याची योजना असून त्यासाठी बनवण्यात आलेल्या निर्भया कोषसाठी 500 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच बहुतांश ट्रेनला ओबीएचएस देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या क्लिन माय कोच अॅपला सक्रिय करण्याची प्रक्रिया सुरु आहे.