मुंबई : स्पेनच्या 23 वर्षीय गार्बिन मुगुरुझानं अमेरिकेच्या 37 वर्षांच्या व्हिनस विल्यम्सचं कडवं आव्हान मोडीत काढलं. व्हिनसचा 7-5, 6-0 अशा सलग दोन सेट्समध्ये पराभव करत मुगुरुझाने पहिल्यांदाच विम्बल्डनच्या विजेतेपदावर नाव कोरलं.

गार्बिनचं आजवरच्या कारकीर्दीतलं हे दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलं. गार्बिननं गेल्या वर्षी सेरेना विल्यम्सला हरवून फ्रेंच ओपन जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर तिला एकाही ग्रँड स्लॅमच्या फायनलमध्ये धडक मारता आली नव्हती. पण यंदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत धडक मारुन तिनं विजेतेपदावरही आपलं नाव कोरलं.

सात वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या व्हिनस विल्यम्सवर मात करुन मुगुरुझाने मिळवलेला विजय अभूतपूर्व ठरला आहे.

'मी व्हिनसला खेळताना पाहतच लहानाची मोठी झाले. त्यामुळे तिच्याविरुद्ध फायनल खेळण्याचा अनुभव अवर्णनीय होता. मी खूप नर्व्हस होते. पहिला सेट कठीण होता.' अशी प्रतिक्रिया मुगुरुझाने विजेतेपदाला गवसणी घातल्यानंतर दिली.