Wimbledon 2021: सर्बियाचा जगातील नंबर वनचा टेनिसपटू नोवाक जोकोविच रविवारी विम्बल्डन चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात मॅटिओ बेरेटिनीविरूद्ध मैदानात उतरेल. जोकोविचची नजर अंतिम सामना जिंकून विक्रमी 20 व्या ग्रँड स्लॅम आपल्या नावे करण्यावर असेल. जर तो असे करू शकला तर रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यासोबत सर्वाधिक एकेरी ग्रँड स्लॅम जेतेपद मिळविणारा खेळाडू होईल.


अंतिम सामन्यापूर्वी तो खूपच चांगल्या स्थितीत असल्याचे जोकोविचने म्हटले आहे. विम्बल्डन जिंकण्याविषयी म्हटला की, "हे माझ्यासाठी सर्वकाही आहे, त्यामुळेच मी इथं आहे. म्हणूनच मी खेळत आहे. लंडनमध्ये येण्यापूर्वी मी कल्पना केली होती की आणखी एक ग्रँड स्लॅम ट्रॉफीसाठी लढण्याची स्थिती निर्माण करेल. आणि सध्या मी स्वत:ला खूप चांगल्या स्थितीत ठेवले आहे."


जोकोविचकडे सुवर्णसंधी
ऑल इंग्लंड क्लबमध्ये सातव्या फायनलमध्ये पोहोचलेला जोकोविच 30 ग्रँड स्लॅम फायनलमध्ये पोहोचलेला रॉजर फेडररनंतरचा दुसरा पुरुष खेळाडू आहे. फेडररने 31 वेळा ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.


एवढेच नव्हे तर नोवाक जोकोविचकडे नदाल आणि फेडररला मागे टाकण्याची देखील संधी आहे. नोवाक जोकोविच 34 वर्षांचा आहे आणि तो बर्‍यापैकी फिट आहे. त्याचवेळी, फेडरर 40 वर्षांचा झाला आहे आणि विम्बल्डन 2021 च्या उपांत्यपूर्व फेरीत तो लयीमध्ये दिसत नव्हता. नदाला तर फ्रेंच ओपनचा बादशाह म्हटले जाते. पण यावेळी नदालदेखील फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात स्थान मिळविण्यात अपयशी ठरला.


त्याचबरोबर यावर्षीच्या दोन्ही ग्रँड स्लॅम जिंकलेला नोवाक जोकोविच उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. विशेष म्हणजे या सर्बियन खेळाडूने फक्त एक सेट गमावल्यानंतर अंतिम फेरी गाठली आहे. याआधी 2013, 2015 आणि 2019 मध्ये तीन वेळा विम्बल्डन फायनलमध्ये त्याला दोन सेट गमवावे लागले होते.