रॉजर फेडररची विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत धडक
एबीपी माझा वेब टीम | 06 Jul 2016 04:05 PM (IST)
विम्बल्डन : स्वित्झर्लंडच्या वर्ल्ड नंबर तीन रॉजर फेडररनं विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. फेडररनं उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाच्या मारिन सिलिचवर संघर्षपूर्ण विजय मिळवला. तीन तास सतरा मिनिटं चाललेला हा सामना फेडररनं 6-7, 4-6, 6-3, 7-6, 6-3 असा जिंकला. या विजयासोबतच फेडररनं ग्रँड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकण्याचा मार्टिना नवरातिलोव्हाचा विक्रमही मोडीत काढला. ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये फेडररनं जिंकलेला हा 307 वा सामना ठरला. फेडररनं आपल्या कारकीर्दीत अकराव्यांदा विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली असून त्याला आता कॅनडाच्या सहाव्या मानांकित मिलो राओनिचचा मुकाबला करायचाय. राओनिचनं अमेरिकेच्या सॅम क्वेरीवर 6-4, 7-5, 5-7, 6-4 अशी मात केली.