मुंबई:  मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईकच्या चिथावणीखोर भाषणांवर भारतीय गुप्तचर यंत्रणा अर्थात आयबीची करडी नजर असल्याची माहिती गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. ते आज दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

 

बांग्लादेशातील ढाकामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दहशतवाद्यांनी आपल्याला झाकीर नाईकच्या भाषणांमधून जिहादची प्रेरणा मिळाल्याचं जाहीर केलं होतं.

 

विशेष म्हणजे, हैद्राबादमधील आयसिसचा म्होरक्या इब्राहीम यजदा यानेसुद्धा झाकीर नाईकच्या शिबिरामध्ये 10 दिवस वास्तव्य केले होते. त्यामुळं झाकीर नाईकची चौकशी करुन त्यावर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

 

झाकीर नाईक स्वत:ला मुस्लीम स्कॉलर समजतो. इतकंच नाही, तर देशभरात तरुणांची शिबिरं घेऊन तो कट्टरवादासाठी त्यांना प्रेरीत करतो. यू ट्यूब, फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्किंगवर साइटवर नाईकचे लाखो फॉलोअर्स आहेत.