अँटिगा : टीम इंडियाने अँटिगा कसोटीच्या चौथ्या दिवशीच वेस्ट इंडिजचा 318 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्याचबरोबर कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत 60 गुणांसह आपलं खातंही खोललं.
या सामन्यात टीम इंडियाने विंडीजसमोर 419 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. पण या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा डाव अवघ्या 100 धावांत आटोपला. विंडीजकडून नवव्या क्रमांकाचा फलंदाज केमार रोशनं सर्वाधिक 38 धावांचं योगदान दिलं. पण विंडीजच्या इतर फलंदाजांनी भारतीय आक्रमणासमोर अक्षरश: लोटांगण घातलं.
भारताकडून जसप्रीत बुमरानं दुसऱ्या डावात सर्वाधिक पाच फलंदाजांना माघारी धाडलं. तर ईशांत शर्मानं तीन आणि मोहम्मद शमीनं दोन विकेट्स घेतल्या. त्याआधी अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी आणि विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियानं आपला दुसऱा डाव सात बाद 343 धावांवर घोषित केला. त्यामुळे टीम इंडियाला दुसऱ्या डावात 418 धावांची भली मोठी आघाडी घेता आली.
उपकर्णधार अजिंक्य रहाणेनं 102 धावांची खेळी उभारली. तर हनुमा विहारीचं शतक अवघ्या सात धावांनी हुकलं. विहारीनं दहा चौकार आणि एका षटकारासह 93 धावा केल्या. तर कर्णधार कोहलीनं 51 धावांचं योगदान दिलं.
रहाणेचं गेल्या दोन वर्षातलं हे पहिलंच आणि कारकिर्दीतलं दहावं शतक ठरलं. ऑगस्ट 2017 मध्ये त्यानं श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटीत अखेरची शतकी खेळी केली होती. त्यानंतर खराब फॉर्ममुळे रहाणेच्या बॅटमधून धावांचा ओघ ओसरला होता. पण विंडीजविरुद्धच्या या कसोटीच्या पहिल्या डावात त्यानं 81 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात शतक झळकावलं.
अँटिगा कसोटीतला विजय हा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने मिळवलेला 27 वा विजय ठरला. या विजयासह कोहलीनं सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी साधली. धोनीनं आपल्या कसोटी कारकीर्दीत साठ सामन्यांत भारतीय संघाचं नेतृत्व करताना 27 वेळा विजय मिळवला होता.
याशिवाय विराटने परदेशात सर्वाधिक कसोटी जिंकण्याचा सौरव गांगुलीचा विक्रम मोडीत काढला. गांगुलीनं आपल्या कारकीर्दीत परदेशात अकरा कसोटी सामने जिंकले होते. अँटिगा कसोटीत मिळालेला विजय हा विराटच्या नेतृत्वात भारतानं परदेशात मिळवलेला बारावा विजय होता.