Veer Mahaan Rinku Singh :  WWE हा शो प्रत्येक जण पाहतो. यात अनेक खेळाडूंनी आपलं नाव या शो मध्ये चांगलच गाजवलय. या शो मध्ये 'द ग्रेट खली' नंतर अग्रक्रमाने घेतलं जाणारं भारतीय नाव म्हणजे वीर महान. सध्या वीर महान सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असतो. त्याच्या फाईट्स या चाहत्यांच कायम लक्ष वेधून घेत असतात. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही त्याचा fan following जबरदस्त आहे. वीर महान हा मूळचा उत्तर प्रदेशातील गोपीगंज इथला. त्याचा जन्म 8 ऑगस्ट 1988 सालचा. लहानपणी त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यात 6 भावंडं त्याचे वडील ट्रक ड्रायव्हर असल्यानं कसाबसा संसाराचा गाडा ते हाकत होते.


उत्तरप्रदेशातील वीर महान WWE मध्ये आला कसा, त्याचा प्रवास नेमका कसा याबद्दल प्रश्न पडलाच असेलच. आजवरच्या त्याच्या प्रवासाला अनेक कंगोरे आहेत. वीरने एका मुलाखतीत सांगितलंय की, त्याला सैन्यात भरती व्हायचं होतं. तो सैन्यात भरती होण्यासाठी गेला देखील, पण वय कमी असल्यानं त्याची निवड होऊ शकली नाही.  कॉलेजमध्ये असल्यापासून तो भाला फेकण्यात तरबेज होता. त्यावेळी त्याला नॅशनल पदक देऊन गौरवण्यात देखील आलं. दरम्यान, त्यानं 'मिलियन डॉलर आर्म' या रियालिटी शोमध्ये भाग घेतला. वेगवान बेसबॉल फेकणाऱ्या खेळाडूंनी या शोमध्ये भाग घेतला होता. त्याचा भाला फेकचा अनुभव त्याला इथे चांगलाच कामी आला. त्यावर एक सिनेमा सुद्धा येऊन गेलाय. वीर महानने ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर त्यानं थेट अमेरिका गाठली. इथून त्याचं आयुष्याचं रुपडंच पालटून गेलं. 


>> अमेरिकेत गेल्यावर काय केलं?


अमेरिकेत गेल्यावर तो तिथल्या अनेक टीम कडून खेळला. त्याचबरोबर अमेरिका बेसबॉल टीम कडून खेळणारा हा पहिला भारतीय खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. पण आकाशाला कवेत घेताना डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात साकारताना पाय मात्र जमिनीवरच ठेवायला तो विसरला नाही.


वर्ष 2018 साली त्याला WWE विषयी माहिती मिळाली. त्यामध्ये त्याने व्यावसायिकरित्या सामील होऊन बेसबॉलला कायमचा राम राम ठोकला.  सुरुवातीला त्याने दुसरा भारतीय खेळाडू सौरव गुर्जरसोबत सिंधू सिंह नावाचा एक संघ तयार केला. काही काळानंतर त्यांच्या टीममध्ये आणखी एक सदस्य जोडला गेला त्याचं नाव होतं जिंदर महल.  या संघाने अनेक सामन्यांमध्ये भाग घेतला आणि सलग 12 सामने जिंकत सगळ्यांच्या काळजात धडकी भरवली. पण काही कारणांमुळे वीरने या संघापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.  


त्यानंतर तो WWE रॉ मध्ये स्वतंत्र कुस्तीपटू म्हणून सहभागी झाला. तेव्हापासून वीर महान हे नाव त्याची ओळख बनली. डोमिनिक मिस्टीरियो या पिता पुत्राच्या जोडीला अस्मान दाखवल्यावर वीर महान चांगलाच चर्चेत आला. या सामन्यानंतर त्याची क्रेझ आणखीनच वाढली. 


>> वीर महानचा आहार आहे तरी काय?


वीर महान हा शुद्ध शाकाहारी आहे. त्याची उंची ही 6 फूट 4 इंच असून वजन हे 125 किलो आहे. आपल्या आहारात तो कायम पालेभाज्या, दूध, दही, तूप लोणी यांचं सेवन तो करत असतो. शाकाहारी आहार घेतल्यावर आपल्या शरीरात कायम अधिक ऊर्जा जाणवते असंही वीर सांगतो. आपण जे काही करतो ते आपल्या कुटुंबासाठी आणि चाहत्यांसाठी करतो असंही त्याने सांगितले. 


WWE हा शो scripted आहे असं म्हणतात. पण याच शो चे जगभरात अफाट चाहते आहेत. या शो ची क्रेझ अजूनही प्रत्येक देशात दिसून येतेय. वीर महानचा हटके लूक, त्याची एंट्री प्रत्येक भारतीयाला आपलसं करते. 'द ग्रेट खली'नंतर WWE च्या रिंगणात भारताच नाव वीर महान मोठं करत आहे. 


पाहा व्हिडिओ: Veer Mahaan Rinku Singh : Baseball Player ते WWE, रिंकूचा धगधगता प्रवास..