Maharashtra Nanded Agriculture News : केळी पिकासाठी जगप्रसिद्ध असलेल्या मराठवाड्यातील नांदेड (Nanded) जिल्ह्यातील अर्धापूर येथील शेतकरी हे सध्या औषधी वनस्पतीचं उत्पादन घेऊन शेतीत वेगवेगळे प्रयोग राबवीत असल्याचं चित्र पहावयास मिळत आहे. ज्यात अर्धापूर तालुक्यातील लहान येथील शेतकऱ्यांनी अश्वगंधा औषधी वनस्पतीच्या शेतीचा यशस्वी प्रयोग (Agriculture News) केला आहे. शेतकरी यातून कमी कालावधीत चांगला नफा देखील कमावत आहेत. लहान येथील नऊ शेतकऱ्यांनी मिळून असाच एक शेतीचा अनोखा प्रयोग यशस्वी केला आहे.


लहान येथील निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तमराव इंगळे यांनी आपल्या शेतामध्ये ड्रॅगन शेतीचा प्रयोग यशस्वी केला होता. आता या पाठोपाठ त्यांनी चाभरा आणि लहान परिसरातील शेतकरी बालाजी इंगळे, व्‍यंकटी इंगळे, गोविंद इंगळे, विनायकराव देशमुख, प्रवीण गिरी, नरेश चाभरकर, राघोजी फरांदे अशा नऊ शेतकऱ्यांना एकत्र घेऊन 14 एकर शेतीत औषधी वनस्पतीची लागवड केली आहे. कमी खर्चात आणि कमी वेळात चांगलं उत्पन्न मिळणाऱ्या अश्वगंधा वनस्पतीच्या शेतीतून सरासरी एकरी 60 ते 70हजार रुपये नफा मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. 


बदलत्या हवामानात आणि आस्मानी संकटं, विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे पारंपरिक शेती करणं मुश्कील झालं आहे. तर शेतीला वारंवार बसणारा नैसर्गिक आपत्तींचा फटका आणि वाढणारा रोगांचा प्रादुर्भाव यामुळं होणारं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक बदल करणं गरजेचं आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे, अर्धापूर तालुक्यातील लहान येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत अश्वगंधा या औषधी वनस्पतींची 14 एकर शेतात लागवड केली आहे. औषधी वनस्पती असणाऱ्या अश्वगंधाची मुळं, पानं आणि बियांची विक्री करून लाखोंचं उत्पन्न घेता येतं. अश्वगंधा गुणवत्तेनुसार, लावगड खर्च 50 हजार रूपये जाता, एकरी 60 ते 70 हजार रुपये नफा मिळू शकतो. यात निंदणी, खुरपणी, औषध फवारणी आणि काढणी इत्यादी एकरी पन्नास हजार रुपये खर्च आला असून सरासरी सव्वा ते दीड लाखाचं उत्पन्न येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. 


अर्धापुर तालुक्यात अश्वगंधा औषधी वनस्पतींची प्रथमच लागवड 


अर्धापूर तालुक्यात अश्वगंधा औषधी वनस्पतीची लागवड करणारं पहिलं गाव म्हणून लहान परीसरातील शेतकऱ्यांनी इतिहास रचला आहे. खर्चात बचत आणि उत्पादनात वाढ, गटशेतीचा फायदा, गटशेती केल्यामुळं बियाणं, खतं, तंत्रज्ञान, वाहतूक हे सर्व खरेदी स्वस्तात झालं आहे. दरम्यान खर्च कमी होऊन उत्पादन खर्चात घट व उत्पादन वाढ, यामुळे गटशेतीचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. जुन्या पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने नवनवीन प्रयोग करत, औषधी वनस्पतींची लागवड करत, कृषी क्षेत्रात चांगला नफा मिळवता येतो . अशी प्रतिक्रिया निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उत्तमराव इंगळे यांनी यावेळी बोलताना दिली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :