30 व्या वर्षी पहिली वन डे; विदर्भाच्या फैझ फजलची ओळख
एबीपी माझा वेब टीम | 16 Jun 2016 03:52 AM (IST)
मुंबईः झिम्बाब्वेविरुद्धची तीन वन डे सामन्यांची मालिका भारताने 3-0 अशी जिंकली. हरारे येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात फैझ फजल या युवा खेळाडूला पदार्पणाची संधी देण्यात आली. फजलने संधीचा फायदा घेत पदार्पणातच अर्धशतक झळकावून भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. फजलने 2010 साली आयपीएलमधून आपली चुणूक दाखवली होती. मात्र त्यानंतर त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. फजलचं रणजी सामन्यांतील रेकॉर्डही चांगलं आहे. त्याच बळावर त्याला भारतीय संघामध्ये संधी मिळाली आहे. कोण आहे फैझ फजल? 30 वर्षीय फैझ फजल हा सलामीवीर फलंदाज असून रणजी सामन्यातील त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. फजल मूळचा नागपूरचा असून रणजीमध्ये तो विदर्भाकडून खेळतो. रणजीमध्ये 2003 साली विदर्भाकडून खेळताना पहिल्याच सामन्यात 151 धावांच्या खेळीसह शानदार पदार्पण केलं होतं. फजलने रणजीच्या 79 सामन्यात एकूण 5 हजार 341 धावा केल्या आहेत. फजलला 2010 साली राजस्थान रॉयल्सकडून खेळण्याची संघी मिळाली होती. त्याने शेवटचा सामना 2011 च्या आयपीएल मोसमात खेळला. त्यानंतर त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. देवधर ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात खेळताना फजलने शतकी खेळी रचली. तर इंडिया 'ए' कडून खेळताना फजलने 112 चेंडूत 100 धावा केल्या होत्या. इराणी चषक 2016 मध्ये खेळताना फजलने 127 धावा ठोकून रेस्ट ऑफ इंडिया संघाला विजय मिळवून दिला होता. या सामन्यात फजलने आव्हानाचा पाठलाग करताना करुण नायरसोबत 480 धावांची भागीदारी रचली होती. फजलच्या नावावर आतापर्यंत सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये 11 शतकं आणि 27 अर्धशतकं आहेत.