तिरुवअनंतपुरम : टीम इंडियाने तिरुवनंतरपुरममधल्या आठ-आठ षटकांच्या सामन्यात न्यूझीलंडचा 6 धावांनी पराभव केला. तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका भारताने 2-1 ने जिंकली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा करत न्यूझीलंडवर मात केली.


राजकोट सामन्यात संथ फलंदाजी केल्याने निशाण्यावर आलेल्या धोनीने या सामन्यात त्याला कॅप्टन कूल का म्हणतात हे दाखवून दिलं. धोनी टीम इंडियामध्ये असणंही किती महत्त्वाचं आहे, ते या सामन्यातल्या अखेरच्या षटकांमध्ये दिसून आलं.

अखेरच्या दोन षटकांमध्ये न्यूझीलंडला विजयासाठी 29 धावांची आवश्यकता होती. जसप्रीत बुमरा गोलंदाजी करत होता. या षटकात धोनीने यष्टीरक्षक म्हणून तो किती फीट आहे, ते तर दाखवून दिलंच, शिवाय त्याच्यातला कर्णधार अजूनही जिवंत असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं.

या अटीतटीच्या लढतीत कर्णधार विराट कोहली क्षेत्ररक्षणासाठी बाऊंड्री लाईनवर उभा होता. तिथूनच तो खेळाडूंना सूचना देत होता. मात्र परिस्थिती पाहता धोनीने स्वतः सूत्र हातात घेतली आणि खेळाडूंना क्षेत्ररक्षणाच्या सूचना दिल्या. त्यानुसार बुमरानेही गोलंदाजी केली.

अखेरच्या निर्णायक षटकात 6 चेंडूत 19 धावांची गरज होती. हार्दिक पंड्या गोलंदाजी करत होता. यावेळीही धोनीने योग्य वेळी आवश्यक तो निर्णय घेत सामना भारताच्या खिशात घातला.