लंडन : इंग्लंडविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेअगोदर टीम इंडियाला मोठा धक्का बसला. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्याच्या जागी इंग्लंडमध्येच भारतीय अ संघाकडून खेळत असलेल्या दीपक चहरला संधी देण्यात आली आहे.


आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळताना आपल्या स्विंगमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या गोलंदाजाला बुमराच्या जागी संधी देण्यात आली. भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि सिद्धार्थ कौल या गोलंदाजांसोबत तो आता खेळणार आहे.

रणजीच्या पदार्पणातच धमाका

2010 साली रणजी क्रिकेटमध्ये राजस्थानचा सामना हैदराबादसोबत होता आणि संघातून 18 वर्षीय दीपक चहर पदार्पण करत होता. त्याने या सामन्यात आपल्या स्विंगची कमाल दाखवत दहा धावा देत आठ फलंदाजांना माघारी धाडलं होतं. या गोलंदाजीमुळे हैदराबादचा डाव केवळ 21 धावांवर आटोपला. संपूर्ण मोसमात त्याने 30 विकेट घेतल्या, ज्यामुळे राजस्थानला दुसऱ्यांदा रणजी चॅम्पियन होता आलं.

दीपक चहरच्या यशामागे भारताच्या माजी प्रशिक्षकांचं वक्तव्य आहे, ज्यात ते म्हणाले होते, की दीपक चहर कोणत्याही संघाकडून खेळण्याच्या लायकीचा नाही. मात्र आपली जिद्द आणि मेहनतीच्या बळावर दीपक चहरने भारतीय संघात जागा मिळवण्यापर्यंत मजल मारली.

ग्रेग चॅपल यांचं वक्तव्य, चहरचं यश

राजस्थान क्रिकेट संघाचे संचालक म्हणून ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू ग्रेग चॅपल यांची नियुक्ती करण्यात आली होती. रणजी संघात जागा मिळवण्यासाठी चहर ट्रायलला आला. मात्र तू रणजी सोड, क्लब क्रिकेटमध्ये खेळण्याच्या लायकीचाही नाही, असं म्हणत त्यांनी 16 वर्षीय चहरला बाहेरचा रस्ता दाखवला. त्याच वेळी त्याने निश्चय केला आणि आज भारतीय संघात जागा मिळवली आहे.

धोनीच्या मार्गदर्शनाखाली आणखी एक क्रिकेटर घडला

दीपक चहरच्या या प्रवासात टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंह धोनीच्या मार्गदर्शनाचाही तेवढाच वाटा आहे. मनप्रीत गोनीपासून ते आर. अश्विनपर्यंत कित्येक खेळाडूंना धोनीच्या नेतृत्त्वात खेळण्याची संधी मिळाली. आता दीपक चहरचाही त्याच यादीत समावेश झाला आहे. आयपीएलमध्ये खेळताना धोनीच्या नेतृत्त्वात दीपक चहर चेन्नई सुपरकिंगज्चा महत्त्वाचा गोलंदाज होता. त्याने आपल्या स्विंगने सर्वांचंच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं, ज्याच्या बळावर त्याला संघात स्थान देण्यात आलं.