कोलंबो : बांगलादेशविरुद्ध तुफानी खेळी करणाऱ्या दिनेश कार्तिकवर सध्या प्रचंड कौतुकाचा वर्षाव होत आहे. खुद्द कर्णधार रोहित शर्मा देखील यात मागे नाही. 'परिस्थिती कशी असो दिनेश कार्तिक आपली सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्यासाठी कायम तयार असतो. मी त्याला सातव्या क्रमांकावर पाठवलं म्हणून तो थोडा नाराज होता. पण सामन्यानंतर तो प्रचंड खुशीत होता.' असं रोहित शर्मा यावेळी म्हणाला.


दिनेश कार्तिकने कालच्या बांगलादेशविरुद्धच्या अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला. यावेळी त्याने केवळ 8 चेंडूत 29 धावा केल्या.



सामन्यानंतर बोलताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, 'तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आमच्यासोबत होता. पण तिथे त्याला खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. आज त्याने जे काही केलं आहे त्यामुळे नक्कीच त्याचा आत्मविश्वास उंचावला असेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा स्वत:वर विश्वास आहे. कोणतीही परिस्थिती असली तरीही तो त्यासाठी तयार असतो. मग तो वरच्या क्रमांकावर फलंदाजी करो अथवा खालच्या क्रमांकावर. आम्हाला संघात अशाच खेळाडूंची कायम गरज असते.'

'जेव्हा मी बाद होऊन डगआऊटमध्ये गेलो त्यावेळी कार्तिक थोडा नाराज होता. त्याला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी जायचं होतं., त्यावेळी मी त्याला म्हटलं की, तू आमच्यासाठी मॅचफिनिशरची भूमिका पार पाडावी. कारण तुझी खरी गरज शेवटच्या दोन ते तीन षटकांमध्ये असणारआहे. त्यामुळे त्याला सातव्या क्रमांकावर पाठवलं. त्यामुळे तो नाराज होता पण त्याने ज्या पद्धतीने सामना संपवला त्यानंतर तो प्रचंड खूश झाला.' असंही रोहित शर्मा म्हणाला.

संबंधित बातम्या
शंकरच्या विकेटमागे लपला होता भारताचा विजय!

देशवासियांनो मला माफ करा, रुबेल हुसेनची भावूक पोस्ट



VIDEO : दिनेश कार्तिकचा विजयी षटकार आणि टीम इंडियाचं सेलिब्रेशन

दिनेश कार्तिकच्या षटकाराने शार्दूलचा जबरदस्त झेल झाकोळला!

... म्हणून दिनेश कार्तिकचा विजयी षटकार रोहित शर्माने पाहिला नाही!

तिरंगी मालिकेत भारताला विजेतेपदासह गुणवान शिलेदारही मिळाले!