नवी दिल्ली : मुंबईत हे आंदोलन यशस्वी करुन दाखवल्यानंतर किसान सभेनं आता आपला मोर्चा दिल्लीच्या दिशेनं वळवला आहे. 9 ऑगस्टला एकाच दिवशी देशभरातले कोट्यवधी शेतकरी जेलभरो आंदोलन करणार आहेत.


सलग सात दिवस पायी चालत महाराष्ट्राच्या विधानसभेला घेराव घालणऱ्या किसान महासभेच्या आंदोलनाची जोरदार चर्चा झाली. आता शेतकऱ्यांच्या संतापाची झळ या आंदोलनानं दिल्लीपर्यंत पोहचवण्याचा अखिल भारतीय किसान महासभेचा प्रयत्न आहे.

दिल्लीत अखिल भारतीय किसान महासभेच्या कार्यालयात पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. डॉ. अशोक ढवळे, अजित नवले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचीही या बैठकीला उपस्थित होती.

मुंबईचं आंदोलन हे एक टप्पा होतं, त्यानंतर अजूनही बरीच ध्येयं गाठायची आहेत, असं म्हणत त्यांनी आपल्या नव्या आंदोलनाची घोषणा केली. उद्यापासून देशभरातल्या शेतकऱ्यांच्या घराघरात जाऊन 10 कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचं निवेदन पंतप्रधानांना पाठवलं जाणार आहे.

संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची संपूर्ण अंमलबजावणी या तीन मुद्द्यांवर हे आंदोलन असेल. या सह्यांचं निवदेन पाठवल्यानंतर 9 ऑगस्टला एकाच दिवशी देशभरातले कोट्यवधी शेतकरी जेलभरो आंदोलन करतील, अशी घोषणा डॉ. ढवळे, नवले व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी केली.