मुंबई : पुसर्ला वेंकट सिंधू... अर्थात पी. व्ही. सिंधू... भारतीय बॅडमिंटनमधलं एक मोठं नाव. पण आज सिंधूनं एक ट्विट केलं आणि त्या ट्विटची सुरुवात पाहून तिच्या अनेक चाहत्य़ांना धक्काच बसला. "डेन्मार्क ओपन माझी शेवटची स्पर्धा... मी निवृत्त झाले." हे वाचून सोशल मीडियात सिंधू निवृत्त झाल्याच्या बातम्या धडकू लागल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. पण भारताच्या या अव्वल खेळाडूनं खरच असं काही पाऊल उचललं का?


सिंधूनं आज 3 वाजून एक मिनिटांनी हा ट्वीट केले. पण या ट्वीटमध्ये ती नक्की काय म्हणाली आणि तिनं नेमकी कोणत्या गोष्टींना आपल्या आयुष्यातून रिटायर केलंय हे तिचं संपूर्ण ट्वीट वाचल्यावर आपल्या लक्षात येईल.





सिंधून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने हे ट्विट केलं. आपल्या पोस्टच्या पहिल्याच पानावर तिने म्हटलंय की "डेन्मार्क ओपन माझी शेवटची स्पर्धा... मी निवृत्त झाले." त्यानंतर दुसऱ्या पानावर लिहिताना सिंधू म्हणते, ''कोरोनानं माझे डोळे उघडले. मी माझ्या प्रतिस्पर्ध्यांना हरवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करते आणि नेहमी करत राहीन. पण आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या कोरोनाला कसं हरवायचं? कोरोनामुळे सध्या जगभरात हाहाकार माजलाय."


पुढे सिंधूनं म्हटलंय की "कोरोना लॉकडाऊनमुळे घरात राहून आता कित्येक महिने उलटले. या काळात मी अनेक कहाण्या वाचल्या आणि स्वत:लाच विचारलं आपण नक्की कोणत्या काळात जगत आहोत?"


कोरोना काळात सगळीकडे अशांतता आणि जीवन अस्थिर झालंय. जिकडे बघावं तिकडे प्रचंड नकारात्मकता आहे. कोरोनाची सतत एक भीती मनात आहे. सगळ्या बाबतीत अनिश्चितता आहे. आणि याच सगळ्या गोष्टींना सिंधून आज रिटायर केलं आहे. त्याचबरोबर कोरोनाला आपण सगळेजण मिळून हरवू शकतो असा विश्वास व्यक्त केला आहे.


गेल्या अनेक महिन्यांपासून सिंधू बॅडमिंटन कोर्टपासून दूर आहे. काही स्पर्धांमधून तिनं माघारही घेतली होती. त्यात डेन्मार्क ओपन स्पर्धेचाही समावेश आहे. आणि याच अर्थानं ही तिची शेवटची स्पर्धा आहे. त्यामुळे लवकरच सिंधूनं बॅडमिंटन कोर्टवर पुनरागमन करणार असल्याचे संकेत दिले आहेत. सिंधू सध्या लंडनमध्ये सराव करत आहे.