नागपूर : ट्वीटरवर मंत्री आदित्य ठाकरे यांना पेंग्विन तर ठाकरे सरकारला औरंगजेब आणि पॉवरलेस सरकार म्हणणाऱ्या समीत ठक्करला नागपूरच्या सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर होताच मुंबई पोलिसांनी मुंबईच्या प्रकरणात समीतला ताब्यात घेतले. दुरांतो एक्प्रेसने मुंबई पोलीस समीत ठक्करला घेऊन निघणार आहे. उद्या सकाळी ते मुंबईला पोहोचणार आहे.


अवघ्या 32 वर्षांच्या समीत ठक्करला ट्विटर वर तब्बल 60 हजार लोकं फॉलो करतात. यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेलमंत्री पियुष गोयल आणि भाजपचे अनेक मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. नागपूर पोलिसांनी 24 ऑक्टोबरला समीत ठक्करला राजकोट मधून ताब्यात घेत नागपूरला आणले होते.


कोण आहे समीत ठक्कर?


32 वर्षांचा नागपूरचा तरुण समीत ठक्कर ट्विटर वर प्रचंड सक्रिय आहे. नागपूरच्या व्हिएमवी कॉलेजमधून त्याने बीकॉमचे शिक्षण पूर्ण केले असून त्याच्या कुटुंबाचा नागपुरात ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे. समीतचे ट्विटर वर 60 हजार फॉलोवर्स आहेत. समीत जरी भाजप नेते फोलो करत असले तरी समीत आमचा कार्यकर्ता नाही, तो पक्षाच्या कुठल्याही व्यासपीठावर पक्षाशी थेट संबंधित नाही, असे भाजपने स्पष्ट केले आहे. तर समीत भाजपच्या आयटी सेलचा कार्यकर्ता असल्याचे आरोप शिवसेनेने केले आहे. समीतचे एक काका कधी काळी शिवसेनेचे स्थानीय नेते राहिले आहे. मात्र, आता ते पक्षात नाहीत.


मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यावर टीका


गेले अनेक आठवडे समीत ठक्कर महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने टीका करत होता. कोरोनाचा वाढत संक्रमण असो, वैद्यकीय सेवांमधील गौडबंगाल असो, पूर्व विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी निर्माण झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान या सर्व मुद्द्यांना घेऊन त्याने अनेक ट्विट्सच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर टीका केली होती. एवढेच नाही तर ठाकरे सरकारचा उल्लेख सतत मॉर्डन औरंगजेब, पॉवरलेस सरकार असा ही केला होता. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना छोटा पेंग्विन संबोधत ट्विटरवर अनेकवेळा त्यांची खिल्लीही उडविली होती. त्यामुळे शिवसैनिकांनी समीत ठक्कर विरोधात 12 ऑगस्टला नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली होती. त्यावर कारवाई करताना पोलिसांनी 24 ऑक्टोबरला त्याला गुजरातमधील राजकोट मधून ताब्यात घेत नागपूरला आणले होते.