जमैका : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात जमैकामध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने यजमानांसमोर विजयासाठी 469 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. प्रत्युत्तरादाखल तिसऱ्या दिवसअखेरीस विंडीजने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 45 धावा केल्या केला. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातील विंडीजनेच केली होती. भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या 117 धावांत गुंडाळला. त्यामुळे या कसोटीत टीम इंडियाला तब्बल 299 धावांची आघाडी मिळाली. पण त्यानंतरही कर्णधार विराट कोहलीने विंडीजला फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली आणि एकामागोमाग चार विकेट्स पडल्या. मात्र अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांची अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांच्या भागीदारीमुळे 168 धावांवर भारताने आपला डाव घोषित केला. परिणामी विंडीजसमोर 469 धावांचं विराट लक्ष्य ठेवलं. यावेळी मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा यांनी भारताला दोन विकेट्स मिळवून दिल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी विंडीजच्या 2 बाद 45 धावा झाल्या होत्या. ब्राव्हो 18 आणि ब्रुक्स 4 धावांवर नाबाद होते.

हनुमा विहारीचं पहिलं शतक
भारताच्या हनुमा विहारीने जमैका कसोटीत आपल्या कारकीर्दीतलं पहिलं शतक झळकावलं. त्यामुळे भारताला पहिल्या डावात सर्व बाद 416 धावांची मजल मारता आली. अँटिगाच्या पहिल्या कसोटीत हनुमा विहारीचं शतक सात धावांनी हुकलं होतं. पण जमैकाच्या दुसऱ्या कसोटीत त्याने 225 चेंडूंत 16 चौकारांसह 111 धावांची खेळी उभारली. त्याने ईशांत शर्माच्या साथीने आठव्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी रचली. त्यात ईशांतचा वाटा 57 धावांचा होता.

बुमराची हॅटट्रिक
जसप्रीत बुमरा हा कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी भारताच्या हरभजनसिंह आणि इरफान पठाण यांनी कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम गाजवला होता. जमैका कसोटीत बुमराने डॅरेन ब्राव्हो, शामर ब्रूक्स आणि रॉस्टन चेस या तिघांना लागोपाठच्या तीन चेंडूंवर माघारी धाडून हॅटट्रिक साजरी केली. वास्तविक पंचांनी रॉस्टन चेसला नाबाद ठरवलं होतं. पण टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने केलेलं डीआरएस अपील, पंचांनी उचलून धरलं. त्यामुळे बुमराने आपल्या हॅटट्रिकचं श्रेय विराटला दिलं आहे.