मुंबई : अमरावतीचा शिव ठाकरे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला आहे. या पर्वाचं विजेतेपद कुणाला मिळणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती पण शिव ठाकरेने आपणच या घरातले बॉस असल्याचं दाखवून दिलं आहे. वीणा जगताप सोबत असलेल्या मैत्रीमुळे शिव या संपूर्ण पर्वात चर्चेत होता. अभिनेत्री नेहा शितोळे या स्पर्धेची उपविजेती ठरलीय आहे. शिव ठाकरेसोबत नेहा शितोळे, वीणा जगताप, शिवानी सुर्वे, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर हे स्पर्धक टॉप 6 मध्ये होते.


26 मे रोजी सुरु झालेलं हे बिग बॉस मराठीचं दुसरं पर्व घरातील भांडणं, रोमान्स, टास्क, एकमेकांबद्दलचं गॉसिप यामुळे चांगलंच चर्चिलं गेलं. सर्व स्पर्धकांनी 100 दिवसात या स्पर्धेला रंगत आणली.

बिग बॉसच्या घरात सुरुवातीला 15 जणांनी प्रवेश केला होता. नंतर वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे अजून दोन जण घरात गेले. म्हणजेच दुसऱ्या पर्वाच्या जेतेपदासाठी 17 जणांमध्ये स्पर्धा होती. एलिमिनेशनच्या माध्यमातून एक-एक करत 11 जण घराबाहेर पडले. तर काही 'तांत्रिक' कारणांमुळे काही स्पर्धकांचं (बिचुकले आणि शिवानी) घरात येणं-जाणं होत राहिल्याचं दिसून आलं.

मराठी मनोरंजन विश्वातील बिग बॉस अर्थात दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या पर्वाचं खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केलं. दर शनिवारी- रविवारी घेण्यात येणाऱ्या विकेंडचा डावमधून स्पर्धकांना त्यांनी केलेल्या बेधडक मार्गदर्शनामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.

शिव ठाकरे हा मूळचा अमरावतीचा आहे. 'रोडीज' या रिअॅलिटी शोमधून त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. मराठी बिग बॉसच्या घरात सुरुवातीला तो प्रेक्षकांवर फार प्रभाव पाडू शकला नव्हता. परंतु हळूहळू विविध टास्क्समधून त्याने त्याचा जोर दाखवला आणि तो या पर्वाच्या विजेतेपदाचा दावेदार असल्याचे सिद्ध केले. वीणा जगतापसोबतची त्याची मैत्री विशेष चर्चेचा विषय ठरली. बिग बॉसनंतर शिव आणि वीणा लग्न करणार असल्याचे त्यांनी अगोदरच जाहीर केलं आहे.

वाचा : शिव आणि वीणा बोहल्यावर चढणार!

'बिग बॉस'... प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा टाईमपास