1st T20 Ind Vs NZ : यजमान किवींचा धुव्वा उडवण्यासाठी भारत सज्ज
एबीपी माझा वेब टीम | 06 Feb 2019 07:14 AM (IST)
टी20 मालिकेसाठी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली असून रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया यजमान किवींचा मुकाबला करणार आहे.
मुंबई : भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. उभय संघातल्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना वेलिंग्टनमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी बारा वाजता हा सामना सुरु होईल. टी20 मालिकेसाठी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली असून रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया यजमान किवींचा मुकाबला करणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय साजरा केला होता. भारताने ही मालिका 4-1 ने खिशात घातली होती. परदेशी भूमीत विजयाचे नवे मापदंड रचण्याचा प्रयत्न टीम इंडिया गेल्या तीन महिन्यांपासून करत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहलीच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाने कसोटी मालिकेत यजमान संघावर 2-1 ने ऐतिहासिक विजय मिळवला होता. भारताने तब्बल 71 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली. त्यानंतर झालेल्या दोन सामन्यांची टी20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली होती. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात इतकं मोठं यश मिळालं.