मुंबई : भारतीय चलनातील नोटा ओळखताना अंध व्यक्तींना अनेक अडचणी येतात. अमेरिकेसारख्या प्रगत देशात अंधांच्या सोईसाठी मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहेत. त्यामुळे भारतातही नेत्रहीन व्यक्तींच्या सोईसाठी चलन ओळखणारे एखादे मोबाईल अॅप तयार करण्याबाबत विचार करा, असे निर्देश हायकोर्टाने मंगळवारी रिझर्व बँकेला दिले.
नवीन नोटा व नाणे स्पर्शाद्वारे ओळखणे कठीण जात असून या नोटा व नाण्यांमध्ये विशेष खुणा आणि चिन्हे समाविष्ट करावीत, या मागणीसाठी नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाईंड (नॅब) या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन एम जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. अंध व्यक्तींना नोटा ओळखता याव्यात यासाठी 100 आणि त्यापेक्षा अधिक चलनाच्या नोटांवर स्पर्शाने ओळखता येतील अशी चिन्हे यापूर्वीच देण्यात आली आहेत. तसेच त्यासाठी लागणारे यंत्र तयार करण्यासाठी निविदाही काढण्यात आली आहे, अशी माहिती आरबीआयनं हायकोर्टात दिली.
त्यावर या नोटा ओळखता याव्यात यासाठी तुम्ही एखादं मोबाईल अॅप्लिकेशन का तयार करत नाहीत? अशी विचारणा हायकोर्टाने आरबीआयला केली व याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत सुनावणी चार आठवड्यांकरीता तहकूब केली.