जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पूर्वतयारीनिशी येणं गरजेचं असल्याच्या मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या वक्तव्यावर कर्णधार विराट कोहलीनेही आपलं मत मांडलं आहे. मात्र रवी शास्त्री यांच्या मताशी विराट कोहली असहमत असून टीम इंडिया पूर्ण तयारीनेच दक्षिण आफ्रिकेत आली होती, असं कोहलीचं म्हणणं आहे.


भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीशी ताळमेळ बसवण्यासाठी कमीत कमी दहा दिवस अगोदर येणं गरजेचं होतं, असं मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केलं होतं. ज्याच्याशी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली असहमत आहे. टीम इंडिया सज्ज होती, असं त्याचं म्हणणं आहे.

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन सामने गमावले आहेत. या मालिकेत दक्षिण आफ्रिका 2-0 ने विजयी आघाडीवर आहे. पहिल्या कसोटीत 72 आणि दुसऱ्या कसोटीत 135 धावांनी पराभव स्वीकारत 26 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेत जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं.

''मालिका सुरु होण्यापूर्वी आम्ही तयार नव्हतो, असं मला वैयक्तिकपणे वाटत नाही आणि मालिका गमावल्यानंतर असं म्हणणारही नाही. आमच्याकडे तयारी करण्यासाठी एक आठवडा होता. पूर्णपणे सांगायचं झालं तर पाच दिवस होते, कारण एक दिवस प्रवासात गेला होता,'' असं विराट कोहली म्हणाला.

जोहान्सबर्गमध्ये सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी तो बोलत होता. जोहान्सबर्गमध्ये मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे.

''आमच्याकडे जे होतं, त्याच्याच बळावर आम्ही पुढे गेलो. हातात असलेल्या संधीचं सोनं करता आलं नाही, ही आमची चूक होती, ज्यामुळे मालिकेत आम्ही पिछाडीवर आहोत. पराभवानंतर बाहेरच्या कारणांचा विचार करुन चालणार नाही,'' असंही कोहली म्हणाला.

''जबाबदारी ही कुणाही एकाची नसते. दौऱ्याच्या तयारीसंबंधित जबाबदारी ही सर्वांची आहे आणि यावर गेल्या अनेक दिवसांपासून विचार सुरु आहे,'' असंही विराट कोहली म्हणाला.