केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत पराभवाचा सामना करायला लागल्यानंतर फलंदाज आव्हानाचा पाठलाग करण्यात कमी पडले, असं कर्णधार विराट कोहलीने मान्य केलं आहे. एखाद्या फलंदाजाने तरी 70-80 धावांची खेळी करणं गरजेचं होतं, असं तो म्हणाला.


''हा चांगला प्रयत्न होता, मात्र कुणीतरी 75 ते 80 धावांची खेळी करण्याची गरज होती. 20 किंवा 30 धावा पुरेशा नव्हत्या. त्यांच्याकडे एक फलंदाज कमी (डेल स्टेन) होता. तरीही त्यांनी चांगला खेळ केला. आम्हाला चुका सुधारण्याची गरज आहे'', असं विराट म्हणाला.

भारताच्या पहिल्या डावात हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमार यांच्यात आठव्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी झाली. याशिवाय कुणालाही मोठी खेळी करता आली नाही, जो भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे.

विराटने पंड्याचंही कौतुक केलं, ज्याने 93 धावांची खेळी केली होती.

या कसोटीत तिसऱ्या दिवशी पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नव्हता. पण प्रतिस्पर्धी संघांच्या वेगवान गोलंदाजांनी चौथ्या दिवसाच्या खेळावर निर्विवाद गाजवलं.

आधी भारताच्या वेगवान चौकडीने दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या 130 धावांत गुंडाळला. त्यामुळे टीम इंडियासमोर विजयासाठी 208 धावांचंच लक्ष्य होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव 135 धावांतच आटोपला.