विशाखापट्टणम : इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी सलामीवीर फलंदाज के एल राहुल अंतिम अकरा खेळाडूंमध्ये असेल, असं मुख्य प्रशिक्षक अनिक कुंबळे यांनी स्पष्ट केलं आहे.

राजकोट कसोटीमध्ये गौतम गंभीरची कामगिरी निराशाजनक राहिल्याने के एल राहुलला संघात परत बोलावण्यात आलं आहे. राहुलने रणजी सामन्यात राजस्थानविरुद्ध दमदार खेळी केली. त्याच्याच जोरावर त्याला पुन्हा एकदा टीम इंडियात खेळण्याची संधी मिळाली आहे.

राहुलला दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित मालिकेला मुकावं लागलं होतं. मात्र सध्या राहुल चांगल्या फॉर्मात आहे. शिवाय त्याची अंतिम अकरामध्ये गरज असल्याने त्याला परत बोलावलं, असं अनिल कुंबळेंनी सांगितलं.

दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील गोलंदाजांच्या कामगिरीचं कुंबळेंनी कौतुक केलं. उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांच्या गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांना जेरिस आणलं, अशा शब्दात गोलंदाजांच्या कामगिरीवर कुंबळेंनी समाधान व्यक्त केलं.