सांगली : नोटाबंदीची झळ तमाशाच्या फडाला बसली आहे.  पंतप्रधान मोदींच्या या निर्णयामुळे लोककलावंताची मोठी अडचण निर्माण झाली आहे. आधीच बुकिंगवर मोठा परिणाम होत असताना, तमाशात लोक मुद्दाम 500 आणि 1000 च्या नोटा देत आहेत. फडातल्या लोकांना पोसायचं कसं, असा प्रश्न उभा राहिला आहे. अनेक कलाकारांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.


पंतप्रधान नरेंद मोदी यांनी कडक निर्णय घेत अचानक 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्दबातल केल्या. पण काही तासातच या निर्णयाचा मोठा परिणाम संपूर्ण देशात दिसून येऊ लागला. यात प्रथम भरडला गेला तो सर्वसामान्य माणूस.

लोककलावंतना देखील या निर्णयाची मोठी झळ सहन करावी लागते आहे. तमाशाच्या प्रयोगाच्या बुकिंगमध्ये लोक 500 आणि 1000 ची नोट पुढे करत सुट्टे पैसे मागत आहेत. यामुळे या फडातील लोकांची मोठी अडचण झाली आहे.

एक वर्षाच्या गॅपनंतर सांगली जिल्हातील काळू-बाळू लोकनाट्य तमाशा मंडळाने नव्या दमाने तमाशाच्या खेळाला सुरुवात केली. राज्यातील अनेक ग्रामीण भागात जाऊन या कलावंतानी फड गाजवण्यास सुरवात केली. पण मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा बंदीचा निर्णय जाहीर केला आणि या लोकांच्यावर संकटाचे मळभ दिसू लागले.

मराठवाड्यातील एका गावातून तमाशाचा  खेळ उरकून काळू-बाळू लोकनाट्य तमाशा मंडळाचे बिराड मिरज तालुक्यातील मालगांवात दाखल झालं.  पण नोटा बंदीचा त्यांच्या व्यवसायावर झालेला परिणाम त्यांच्या अस्वथ चेहऱ्यावरून स्पष्टपणे जाणवत होता. कारण कालच्या-परवाच्या फडामध्ये प्रेक्षकांनी  हातात ठेवलेल्या बंद झालेल्या 500 आणि 1000 च्या नोटा, सुट्या पैशाची केलेली मागणी आणि इतके पैसे देण्यास आपण असलेलो असमर्थ या साऱ्या अडचणी आजही येणार होत्या.

ग्रामीण भागातील लोकांची खरी नाळ ही लोककलेशी जोडली गेली आहे. यामुळे जत्रेत या तमाशाला मोठी मागणी असते. मात्र या नोटा बंदी मुळे  हा व्यवसाय आणखीच अडचणीत आला आहे. यामुळे तमाशा फड मालकांनी आता 500 आणि 1000 च्या नोटा देखील घेणे बंद केले आहे.

नोटाबंदीच्या या निर्णयामुळे आधीच नामशेष होत चाललेला तमाशा ही लोककला अधिकच अडचणीत आली आहे. यामुळे सामान्य माणसाबरोबर आता अशा अनेक लोककला या नोटा बंदीच्या निर्णयामुळे लुप्त होतात काय अशी भीती आहे.