विशाखापट्टणम : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने आपली पकड आणखी मजबूत केली आहे. भारताने इंग्लंडचा पहिला डाव 255 धावांवर गुंडाळून 200 धावांची आघाडी घेतली आहे.


पण विशेष म्हणजे भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडवर फॉलोऑन न लादण्याचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंडने आज सकाळी दुसऱ्या दिवशीच्या पाच बाद 103 धावांवरुन खेळायला सुरुवात केली. बेन स्टोक्स आणि जॉनी बेयरस्टोने सहाव्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी करुन इंग्लंडचा डाव  सावरला. बेन स्टोक्सने 70 आणि जॉनी बेयरस्टोने 53 धावांची खेळी केली. पण उमेश यादवने बेयरस्टोचा त्रिफळा उडवला आणि भारताच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या.

आर. अश्विनच्या फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं. अश्विनने 67 धावा देत पाच फलंदाजांना माघारी धाडत इंग्लंडचं कंबरड मोडलं. तर मोहम्मद शमी, उमेश यादव, रवींद्र जाडेजा आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.