नवी दिल्ली: टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग आपल्या फलंदाजीप्रमाणेच सोशल मीडियावरही धडाकेबाज बॅटिंग करत आहे. सेहवागने नुकतेच अनेक खेळाडूंना आपल्या हटके स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे सेहवागचे चाहतेदेखील सकाळी झोपून उठल्यानंतर सर्वात पहिला त्याचा ट्विट पाहात असल्याचे सांगत आहेत.

 

काही दिवसांपूर्वी सेहवागने पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमलची खिल्ली उडवल्याने पाकिस्तानमधील क्रिकेटप्रेमी सेहवागवर कमालीचे संतप्त झाले. अशाप्रकारचे ट्विट पाकिस्तानचा रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरसाठी करून, सेहवागने त्याची खिल्ली उडवली होती.

 

आपल्या या हटके स्टाईलमुळे सेहवागचे अनेकांनी कौतुकही केले, तर पाकिस्तानी क्रिकेटपटूंची खिल्ली उडवल्याने त्याच्यावर टीकाही झाली. पाकिस्तानच्या काही क्रिकेटप्रेमींनी तर सेहवागला ट्विट करून जुनैद खानने आऊट केलेल्या प्रसंगाची आठवण करून दिली.

 

आता पाकिस्तानी क्रिकेटपटूंची खिल्ली उडवल्यानंतर, सेहवागने आपलाच माजी सहकारी विराट कोहलीचीदेखील मिश्किल अंदाजात खिल्ली उडवली. वेस्ट इंडिज विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराटने दमदार शतक झळकावल्यानंतर त्याचे कौतुक केले. विशेष म्हणजे, सेहवागने या सामन्यापूर्वीच विराट शतक झळकावेल असा अंदाज व्यक्त केला होता.

 

सेहवागने विराटच्या शतकाची तुलना मूली पराठ्याशी करून त्याला कबालीशी जोडणारे मजेदार ट्विट केले आहे. ते म्हणतो की, '' सध्या तीन 'ली' चांगलेच फॉर्ममध्ये आहेत, एक कोहली, दोन म्हणजे मूली(पराठा) आणि तिसरा म्हणजे कबाली. या तिन्हीचा आज सर्वांनीच आनंद घ्यावा. मूली पराठा खाऊन रजनीकांतचा कबाली हा चित्रपट पाहा, आणि त्यातच विराटची शतकी खेळी पाहाल, तर तीही तुम्हाला तितकाच आनंद देईल.''

 

 


रजनीकांतचा कबाली हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपट गृहाबाहेर लांबच लांब रांगा लवलेल्या आहेत. तर दुसरीकडे टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने द्विशतक झळकावून भारतीय संघाला चांगली आघाडी मिळवून दिली आहे.