मुंबई: गेल्या शनिवारी इराणसोबत झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय कबड्डी संघाने इराणला 39-29 ने धूळ चारत कबड्डीच्या विश्वचषकावर आठव्यांदा आपलं नाव कोरलं. भारतीय संघाने हा चषक सलग तिसऱ्यांदा आपल्या नावावर केला आहे. भारतीय कबड्डी संघाच्या या विजयानंतर टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने ट्विटरवरुन भारतीय संघाचे अभिनंदन केले. याशिवाय त्याने ब्रिटीश पत्रकार पियर्स मॉर्गनला पुन्हा सुनावलं.


भारतीय कबड्डी संघाने विश्व चषक जिंकल्यानंतर वीरेंद्र सेहवागने दोन ट्विट केले. यातील पहिल्या ट्विटमध्ये वीरुनं भारतीय संघाचं अभिनंदन केलं. तो म्हणाला की, ''हा उत्साह, हे स्पिरीट, हम को दे दे ठाकूर!!!! अजय ठाकूर तू रॉकस्टार आहेस. पराभवातूनही विजय खेचून आणणाऱ्याला टीम इंडिया म्हणातात! चॅम्पियन्स!!!''



यानंतर वीरुने आपल्या दुसऱ्या ट्वीटमधून ब्रिटीश पत्रकार पियर्स मॉर्गनची कोंडी केली. वीरुनं आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये, ''भारताने कबड्डी या खेळाला जन्म दिला, अन् आठवेळा विश्व चॅम्पियन बनला. पण काही देश असे आहेत, ज्यांनी क्रिकेटला जन्म दिला. पण सध्या टायपोजच दुरुस्त करण्यात व्यस्त आहेत.''


वीरुच्या या ट्वीटला ब्रिटीश पत्रकार पियर्स मॉर्गननेही उत्तर दिलं. मॉर्गन म्हणतो की, ''मित्रा!!! आम्ही डार्ट आणि कर्लिंगचा अविष्कार केला. पण आम्ही यात चॅम्पियन आहोत असं मी कधीही म्हणणार नाही.''



कबड्डीसंदर्भातील मॉर्गनने आणखी एक ट्विट करुन वीरुला उत्तर दिलं आहे. मॉर्गनने आपल्या ट्विटमध्ये, ''कबड्डी हा काही खेळ नाही. हा केवळ ज्येष्ठांचा भार आहे, जे चोहोबाजूंनी धावपळ करुन एक दुसऱ्याला हात मिळवतात.''

काही दिवसांपूर्वी कबड्डीच्या विश्व चषकात भारतीय संघाने इंग्लंडला 69-18 ने धोबी पछाड दिली होती. त्यावेळीही सेहवाग आणि पियर्स मार्गन ट्विटरवरुन एकमेकांसोबत भिडले होते. ब्रिटीश पत्रकार मॉर्गनच्या एका ट्वीटवरुन सेहवागने मॉर्गनला सुनावलं होतं. सेहवाग म्हणाला होता की, ''पुन्हा एकदा इंग्लंडला विश्वचषकात भारताकडून मात खावी लागली. यावेळी कबड्डीत भारताने 69-18ने धूळ चारली आहे.''

यावर मॉर्गनने सेहवागला उत्तर देताना, lose आहे, पण loose नाही असं लिहलं होतं.

वीरु आणि मॉर्गनस ऑलिम्पिकमधील पीव्ही सिंधूच्या रौप्य पदकाच्या कमाईवरुन एकमेकांशी भिडले होते. तेव्हाचे या दोघांचे ट्विटयुद्ध चांगलेच रंगले होते. त्यावेळच्या वीरुच्या ट्वीटने मॉर्गनची बोलतीच बंद झाली होती.