मुंबई : टीम इंडियाचा कसोटी क्रिकेट कर्णधार विराट कोहली फलंदाजीशिवाय अभिनेत्री अनुष्का शर्मासोबतच्या अफेअरमुळेही चर्चेत असतो. मार्च 2016 मध्ये अनुष्काच्या समर्थनार्थ केलेलं ट्वीट हे वर्षातील सर्वाधिक प्रभावशाली हॅशटॅग ट्वीट बनलं आहे.

टी-20 विश्वचषकादरम्यान विराट कोहली काही सामान्यात फ्लॉप ठरला होता. त्यावेळी ट्विपल्सनी त्याची गर्लफ्रेण्ड अनुष्का शर्माला दोषी ठरवत तिच्यावर निशाणा साधला होता. यानंतर अनुष्का ट्विटरवर ट्रोल होऊ लागली. पण अनुष्काची खिल्ली उडवणाऱ्या ट्विपल्सना विराट कोहलीने सडतोड उत्तर दिलं. विराटने 28 मार्च रोजी ट्वीट केलं होतं की, "अनुष्काला सातत्याने ट्रोल करणाऱ्या लोकांनी शरम बाळगा. अनुष्काकडून मला केवळ सकारात्मकता मिळाली आहे."

https://twitter.com/imVkohli/status/714376407606960128

विराटच्या या ट्वीटला त्याच्या फॉलोअर्सनही जोरदार प्रतिसाद दिला. तब्बल 39 हजारहून अधिक ट्विटराईट्सनी रिट्वीट केलं आणि एक लाखांपेक्षा जास्त लोकांनी ते लाईक केलं होतं. त्याचं हे ट्वीट 'गोल्डन ट्वीट ऑफ द इअर' ठरलं आहे.



ट्विटर दरवर्षी #yearontwitter रिपोर्ट प्रकाशित करतं. या रिपोर्टमध्ये वर्षभरात भारतात छाप पाडलेल्या ट्रेण्डचा समावेश केला जातो. यामध्ये लोकप्रिय हॅशटॅग, मोस्ट फॉलोड अकाऊंट, टॉप मूव्हमेंट आणि सर्वात लोकप्रिय ट्वीट्सचाही समावेश होतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच जाहीर केलेला 'नोटाबंदी'चा निर्णयही ट्विटरवर प्रभावशाली क्षण होता. ट्विटर इंडियाच्या 'इयर ऑन ट्विटर'मध्ये 'नोटाबंदी' पहिल्या स्थानावर आहे. यानंतर रिओ 2016, INDvPAK, दिल्ली प्रदूषण यांचा क्रमांक आहे. ट्विटरवर पंतप्रधान मोदी भारतात सर्वाधिक फॉलो केले जाणारे व्यक्ती आहेत. ट्विटरवर त्यांचे 24.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.