नवी दिल्ली : केपटाऊनमधील पराभवाने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हादरला आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, त्याने सेन्चुरियन कसोटीत असे काही बदल केले आहेत, ज्यावर दिग्गजांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिवाय सर्वांना आश्चर्याचा धक्काही बसला आहे.

‘करो या मरो’ची परिस्थिती असताना संघातील सर्वात यशस्वी गोलंदाजालाच विराट कोहलीने बाहेर बसवलं आहे. भुवनेश्वर कुमारच्या जागी इशांत शर्माला संधी देण्यात आली आहे. केपटाऊन कसोटीत भुवनेश्वर कुमारने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांमध्ये धडकी भरवली होती. त्याने सर्वाधिक 6 विकेट घेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती.

उसळत्या खेळपट्टीवर इशांत शर्मा भुवनेश्वरपेक्षा जास्त फायदेशीर राहिल, असं विराटचं म्हणणं आहे. मात्र उसळते चेंडू टाकण्यामुळे ज्या गोलंदाजाला दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज घाबरत होते, त्यालाच संघातून आऊट केलं आहे.

दिग्गजांनीही विराटच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. सेन्चुरियनसारख्या खेळपट्टीवर उसळते चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजापेक्षा स्विंग करणाऱ्या गोलंदाजाचा फायदाच झाला असता, असं लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी म्हटलं आहे. तर भुवीला बाहेर बसवणं हे चुकीचं असल्याचं निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांचं म्हणणं आहे.

विराटच्या या निर्णयावर सोशल मीडियातूनही दिग्गजांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. भुवीला बाहेर बसवणं ही मस्करी आहे का, असा सवाल दक्षिण आफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज एलन डोनाल्ड यांनी केला आहे.

केवळ भुवनेश्वरच्या बाबतीतच नाही, तर विराटने आणखी काही निर्णय असे घेतले, जे जाणकारांनाही धक्का देणारे आहेत. उपकर्णधार अजिंक्य रहाणेला सलग दुसऱ्या कसोटीतून बाहेर बसवणं, जसप्रीत बुमराकडून नव्या चेंडून गोलंदाजी करणं या निर्णयांवर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

सेन्चुरियन कसोटीचा निकाल समोर येणं बाकी आहे. दक्षिण आफ्रिकेने केलेली सावध सुरुवात आणि भारतीय गोलंदाजांची लागलेली कसोटी हे बरंच काही सांगत आहे. त्यामुळे विराटचे हे निर्णय किती यशस्वी होतात, ते आता येणारा काळच ठरवणार आहे.