नवी दिल्ली : परदेश दौऱ्यावर खेळाडूंच्या पत्नीला पूर्णवेळ सोबत ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआयकडे केली आहे. सध्याच्या नियमानुसार खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या पत्नी परदेश दौऱ्यावर दोन आठवड्यांसाठीच सोबत राहू शकतात.
काही वृत्तांनुसार, विराटने बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा मांडला. ज्यानंतर अधिकाऱ्यांकडून सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या सीओए समितीचे प्रमुख विनोद राय आणि डाईना इडुलजी यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सीओएने टीम इंडियाचे व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांना यासाठी एक औपचारिक विनंती करण्यास सांगितलं आहे. पण यावर तूर्तास अंतिम निर्णय घेतला जाणार नाही.
'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना सूत्रांनी सांगितलं, की, “ही विनंती काही आठवड्यांपूर्वीच करण्यात आली होती. बीसीसीआयच्या धोरणानुसार संघ व्यवस्थापकांना यासाठी एक औपचारिक विनंती करावी लागेल आणि त्यानंतरच निर्णय होईल. विराटची पत्नी अनुष्का शर्मासह इतर खेळाडूंच्या पत्नीही दौऱ्यावर सोबत असतात. त्यामुळे जुन्या नियमांनुसार खेळाडूंच्या पत्नींनाही संघासोबत प्रवास करता यावा, असं विराटचं म्हणणं आहे.”
दरम्यान, परदेश दौऱ्यावर खेळाडूंनी पत्नी किंवा गर्लफ्रेंड सोबत नेण्याबाबत प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम आहेत. सध्या तरी बुहतांश संघाच्या खेळाडूंना कुटुंब सोबत नेण्यासाठी परवानगी दिलेली नाही. 2007 साली इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्वतंत्र क्रीडा प्रशासकांना संघाच्या 5-0 ने झालेल्या पराभवावर प्रश्न विचारला होता. तर खेळाडूंनी कुटुंबासोबत जास्त वेळ घालवल्यामुळे हा पराभव झाला, असं उत्तर आलं होतं.
2015 मध्येही अॅशेस मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ईयान हेलीने खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड्स सोबत असणं हे पराभवाचं कारण आहे, असं सांगितलं होतं.
परदेश दौऱ्यात खेळाडूंच्या पत्नी पूर्णवेळ सोबत असाव्यात, विराटची मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Oct 2018 06:38 PM (IST)
सध्याच्या नियमानुसार खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या पत्नी परदेश दौऱ्यावर दोन आठवड्यांसाठीच सोबत राहू शकतात. या नियमात बदल करण्याची मागणी विराट कोहलीने केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -