नाशिक : मालेगावातील संघर्षयात्रेच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची जीभ घसरली आहे. दोघांची तुलना चव्हाणांनी लघवी करणारा खोडकर शाळकरी मुलगा आणि त्याच्या वडिलांशी केली आहे.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यावर टीका करताना अशोक चव्हाण यांनी एक गोष्ट सांगितली. "एका गावातील शाळेत दुपारच्या सुट्टीत मुलं दुपारचं जेवण करत होती. मात्र एक विद्यार्थी मास्तरांच्या टेबलवर उभा राहून लघवी करत होता. हा प्रकार पाहिल्यानंतर मास्तरांनी सगळा प्रकार मुलाच्या वडिलांना सांगून जाब विचारायचं ठरवलं. त्यासाठी मास्तर मुलाच्या घराजवळ पोहोचले. तेव्हा या विद्यार्थ्याचे वडीलही छतावर उभं राहून लघवी करत असल्याचे मास्तरना दिसलं. अशीच स्थिती आज देशात आणि राज्यात झाली आहे. बाप जैसा बेटा" अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली.
तसेत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने नागरिकांना दरिद्री बनवलं असल्याचा आरोपही चव्हाणांनी यावेळी केला. खान्देशनंतर आज मालेगावात काँग्रेसची संघर्षयात्री पोहोचली आहे. मात्र अशोक चव्हाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
पाहा व्हिडीओ