दिनांक १८ ऑगस्ट २००८... आणि दिनांक २० नोव्हेंबर २०१७...


आंतरराष्ट्रीय कारकीर्द खरं तर अवघी नऊ वर्षांची... पण कामगिरी एखाद्या कसलेल्या महारथीला साजेशी...

तुम्हीच पाहा

318 सामने... 15,748 धावा... त्यात तब्बल 50 शतकं...आणि 77 अर्धशतकं...

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट्समध्ये सध्या पन्नासपेक्षा अधिक सरासरी राखणारा जगातला एकमेव फलंदाज म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली.

विराटनं श्रीलंकेविरुद्धच्या कोलकाता कसोटीत आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतलं पन्नासावं शतक ठोकून मैलाचा एक नवा दगड ओलांडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किमान पन्नास शतकं ठोकणारा विराट हा जगातला आठवा तर सचिननंतरचा दुसरा भारतीय ठरला. वन डे क्रिकेटमध्येही सर्वाधिक वैयक्तिक शतकांच्या यादीत विराट हा सचिननंतर दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळं साहजिकच आता विराट कोहलीची तुलना सचिन तेंडुलकरशी करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपणही पाहूयात की, त्यात दोघांची तुलना होऊ शकते का?

सचिनची कामगिरी

सचिन त्याच्या 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत 664 सामन्यांमध्ये खेळला आहे. त्यात त्यानं  34357 धावांचा रतीब घातला आहे. त्याच्या या कामगिरीला 100 शतकं आणि 164 अर्धशतकांचा साज आहे. सचिनच्या या आकडेवारीशी तुलना करता विराट सचिनपेक्षा अजूनही बराच पिछाडीवर असल्याचं दिसून येतं. पण विराट आज ज्या वेगानं धावा करत आहे, ते पाहता विराटची सचिनशी केलेली तुलना योग्य आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

विराटची कामगिरी

वन डे आणि कसोटी क्रिकेटमध्ये सचिनच्या तुलनेत विराट कुठे आहे हे तुम्हीच पहा...

वन डेत विराटनं आजवर 202  सामन्यांत  55.74 च्या सरासरीनं 9030 धावा फटकावल्या आहेत.

सचिननं 463 सामन्यांत 44.83 च्या सरासरीनं 18426 धावांचा रतीब घातला होता.

या कालावधीत विराटची वन डेत शतकं आहेत 32 तर सचिनची 49.

विराटच्या खात्यात 61 कसोटी सामन्यांमध्ये 18 शतकांसह 4762 धावा जमा आहेत.

सचिननं 200कसोटी सामन्यांमध्ये 51 शतकांसह 15921 धावांची रास उभी केली आहे.

विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं ते 2008 साली. श्रीलंका दौऱ्यातल्या दम्बुला वन डेतून त्यानं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात केली. तोच विराट आज २९ वर्षांचा आहे.

त्यामुळं आयुष्याच्या या टप्प्यावर म्हणजे वयाच्या २९व्या वर्षी सचिनची कामगिरी कशी होती ते पाहू... 

सचिननं 29व्या वर्षी 94 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यात त्यानं 58.72च्या सरासरीनं 7869 धावा झळकावल्या होत्या. त्यात 29 शतकांचा समावेश होता.

वन डेत वयाच्या २९व्या वर्षी सचिनच्या खात्यात  287 सामन्यांमध्ये  31 शतकांसह 11069 धावा जमा झाल्या होत्या.

सचिनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द ही त्याच्या वयाच्या 16व्या वर्षी  सुरु झाली होती. विराट त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतला पहिला सामना वयाच्या 19व्या वर्षी खेळला होता. त्यामुळं त्याच्या आकडेवारीची तुलना अयोग्य ठरावी. पण दोघांची कसोटी आणि वन डे क्रिकेटमधली एकूण आकडेवारी पाहता, विराट आज सचिनपेक्षा अधिक वेगानं धावा फटकावत आहे.

विराटचा आजचा फिटनेस कायम राहिला तर, पुढची 10 वर्षही तो  आरामात क्रिकेट खेळू शकतो. या कालावधीत त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ सुरुच राहिला तर विराट सचिनलाही मागं टाकू शकतो.

सामने          कसोटी शतकं      वन डे शतकं       


29 व्या वर्षी विराटची कामगिरी           61                      18                   32                   

29  व्या वर्षी सचिनची कामगिरी          94                     31                    287