लंडन : क्रिकेटमध्ये चौकार-षटकारांचा उल्लेख होतो, तेव्हा ख्रिस गेल, विराट कोहली, रोहित शर्मा आणि एबी डिव्हिलियर्स यांसारखे फलंदाज डोळ्यासमोर येतात. मात्र ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटर बेथ मूनीने असा विक्रम प्रस्थापित केला आहे की त्याच्यासमोर हे तमाम दिग्गज फलंदाज फेल आहेत.

इंग्लंडविरुद्धच्या ट्वेण्टी-20 सामन्यात बेथ मूनीने नाबाद 117 धावांची खेळी रचली. तिने 70 चेंडूच 19 चौकार आणि 1 षटकाराने ती आपली खेळी सजवली. यासोबतच मूनीने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सर्वाधिक चौकार ठोकण्याचा विश्वविक्रम स्वत:च्या नावावर केला.

खरंतर आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सर्वाधिक चौकार ठोकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाची महिला फलंदाज मॅग लॅनिंगच्या नावावर होता. लॅनिंगने 2014 मधील विश्वचषकात बांगलादेशच्या सिल्हटमधील आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात 126 धावांची खेळी केली होती. तिने या खेळीत 18 चौकार आणि 4 षटकार ठोकले होते.

महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही पुरुष क्रिकेटरने एकाच आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 19 चौकार ठोकण्याचा पराक्रम केलेला नाही. पुरुषांच्या टी-20 सामन्यात सर्वाधिक 14 चौकार ठोकण्याचा विक्रम संयुक्तरित्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल आणि अॅरॉन फिन्च यांच्यासह दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्सच्या नावावर आहे.

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल तर टॉप-30 मध्येही सहभागी नाही. तर विराट कोहली 23 व्या क्रमांकावर आहे. 7 ऑगस्ट, 2012 रोजी श्रीलंकेविरुद्धच्या पल्लेकेलमधील सामन्यात त्याने 68 धावांच्या खेळी 11 चौकार लगावले होते.

भारतीय विक्रमाबाबत बोलायचं झाल्यास रोहित शर्माने टी-20 च्या एका इनिंगमध्ये सर्वाधिक 12 चौकार ठोकले होते. 2 ऑक्टोबर, 2015 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 66 चेंडूत 106 धावांची खेळी रचली होती. यात त्याने 12 चौकार आणि 5 षटकार लगावले होते. सर्वाधिक चौकारांच्या यादीत तो तेराव्या स्थानावर आहे.

सलामीवीर रोहित शर्मानंतर लोकेश राहुलचा नंबर आहे. 27 ऑगस्ट, 2016 रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या नाबाद 110 धावांच्या खेळीत 12 चौकार आणि 5 षटकार ठोकले होते. त्याने 51 चेंडूंचा सामना केला होता.