मुंबई : टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीला प्रतिष्ठेच्या पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. बीसीसीआयने निवडलेल्या वर्षभरातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला हा सन्मान दिला जातो. तिसऱ्यांदा पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित होणारा विराट कोहली हा पहिलाच क्रिकेटपटू ठरणार आहे.
यापूर्वी 2011-12 आणि 2014-15 या वर्षात त्याला हा पुरस्कार मिळाला होता. बंगळुरुत 8 मार्चला विराटचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
भारताचा फिरकीपटू आर अश्विनला दिलीप सरदेसाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अश्विनला दुसऱ्यांदा हा गौरव प्राप्त होणार आहे. 2011 अश्विनला पहिल्यांदा पुरस्कार प्राप्त झाला होता. विशेष म्हणजे दिलीप सरदेसाई पुरस्काराने दोन वेळा सन्मानित होणारा अश्विन हा पहिलाच भारतीय आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवली बंगळुरु कसोटी 8 मार्चला संपणार आहे. याच दिवशी कोहलीचा पुरस्काराने सन्मान होणार आहे. त्यामुळे कसोटी खिशात घातल्यास कोहलीसाठी पुरस्काराचा आनंद द्विगुणित होईल. पुण्यात झालेल्या पहिल्या कसोटीत कांगारुंनी टीम इंडियाचा दारुण पराभव केला होता. ऑस्ट्रेलियाने तब्बल 333 धावांनी विजय मिळवत, तिसऱ्या दिवशीच खेळ खल्लास केला.
तब्बल 19 कसोटी अपराजित राहिल्यावर भारताला पुण्यात पराभवाची चव चाखावी लागली होती. हैदराबाद कसोटीत बांगलादेशवरील विजयानंतर विराट हा भारतातर्फे सलग सर्वाधिक म्हणजे 19 सामने अपराजित राहणारा कर्णधार ठरला होता.
विराटनं माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरांचा 18 कसोटी सामने अपराजित राहण्याचा विक्रम मोडला होता. पण हा विक्रम आणखी उंचावण्याची किमया विराटला साधता आली नाही.