मुंबई : 1972 साली वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळात शरद पवार आणि वसंतदादा दोघेही मंत्री होते. पवारांनी या काळातल्या अनेक किश्श्यांना उजाळा दिला. निमित्त होतं वसंतदादा पाटील यांच्या 28 व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचं.


पद्मभूषण वसंतदादा पाटील यांची आज 28 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्तानं ‘आम्ही सांगलीकर’ या संस्थेनं मुंबईत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. प्रत्येकानंच दादांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

“1972 साली आम्ही दोघे वसंतराव नाईकांच्या मंत्रीमंडळात मंत्री झालो होतो. त्यानंतर शंकरराव चव्हाण आणि स्वतः वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत काम केले. शिक्षण कमी असले तरी अधिकाऱ्यांसोबत जास्तीत जास्त वेळ देऊन एखादा विषय समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असे. साखर कारखाने, सूत गिरणी, डेअरी अशा अनेक संस्थांची उभारणी वसंतदादा यांनी केली.” असे शरद पवार यांनी सांगितले.

“...सरकार पाडल्याचेही दादा विसरले होते”

“वसंतदादा राजस्थानचे राज्यपाल असताना आम्हाला तिथे बोलावून घेतले होते. तिथे त्यांनी राज्य चालवण्यासंबंधी पुढची दिशा ठरवण्यास सांगून माझ्या हातात राज्याचे नेतृत्व दिले. राज्य सुरळीत चालण्यासाठी मी त्यांचे सरकार पाडले होते, हे देखील ते विसरले होते.”, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.

पश्चिम महाराष्ट्रात एकप्रकारे सिलिकॉन व्हॅलीच उभारली.”

“पुणे परिसरात म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात आज 35 इंजिनिअरिंग कॉलेजेस, 212 सॉफ्टवेअर कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. दादांच्या उदारमतवादी धोरणामुळे हे शक्य झाले. सिलिकॉन व्हॅलीच एकप्रकारे या भागात उभी राहिली आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीही दादांच्या प्रयत्नामुळे उभी राहीली. पुणे रिजनमध्ये 54 हजार लोक काम करत आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजमधून मोठ्या प्रमाणात इंजिनिअर तयार झाल्यामुळे हे शक्य झाले.”, असेही पवारांनी सांगितले.

वसंतदादांचा हा विधायक दृष्टिकोन नव्या पिढीत कसा रुजेल, त्यांचा विचार वृद्धिंगत करण्यासाठी आपण पावले टाकली, तर राज्यही विधायक मार्गावर जाऊ शकेल, असेही शरद पवार यांनी उपस्थितांना अवर्जून सांगितले.