राजकोट (गुजरात) : वयाच्या 18-19 व्या वर्षी देशाकडून खेळणं हे कोणत्याही खेळाडूसाठी अभिमानाची बाब असते. हाच अभिमान घेऊन मुंबईचा धडाकेबाज फलंदाज आणि भारताला अंडर 19 विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार पृथ्वी शॉ आज टीम इंडियाकडून मैदानात उतरत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध विराट कोहलीच्या टीम इंडियाची पहिली कसोटी आज राजकोटमध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातून पृथ्वी शॉ कसोटी पदार्पण करत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करताना कोणत्याही खेळाडूवर दबाव असतोच. पृथ्वी शॉवरही दबाव होता का असं जेव्हा त्याला विचारलं, तेव्हा त्याने कर्णधार विराट कोहलीमुळे दबाव नसल्याचं सांगितलं. 

विराट कोहलीने भन्नाट आयडिया लढवत, कारकिर्दीतील पहिलीच मॅच खेळणाऱ्या पृथ्वी शॉवरचा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. कोहलीने पृथ्वी शॉसोबत थेट मराठीत संवाद साधला.  मुंबईकर पृथ्वी शॉ सोबत मराठीत बोलून कोहलीने त्याला आपलंस केलं. त्यामुळे पृथ्वी शॉही काहीसा दबावमुक्त झाला.

बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान खुद्ध पृथ्वी शॉने याबाबतची माहिती दिली.

पृथ्वी म्हणाला, “मैदानाबाहेर विराट कोहली एक मजेशीर, विनोदी माणूस आहे. मैदानावर तो किती गंभीर असतो हे आपण पाहिलं आहे. मी कोहलीशी बातचीत केली, त्यावेळी त्याने मला ज्योक ऐकवले. त्याने मराठीतही बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र ते खूपच विनोदी होतं.”


पृथ्वी शॉने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 14 सामन्यात 56.72 च्या जबरदस्त सरासरीने 1418 धावांचा रतीब घातला आहे. त्यात सात शतकं आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. या कामगिरीच्या जोरावर त्याची टीम इंडियात निवड झाली आहे.

टीम इंडियातील निवडीबद्दल पृथ्वी शॉ म्हणाला, “मला खूपच भारी वाटतंय, थोडा दबाव वाटत होता. मात्र ड्रेसिंग रुममध्ये विराट भाई आणि रवी सर (रवी शास्त्री) यांनी इथे कोणीही ज्युनिअर-सीनियर नाही हे सांगितल्याने दबाव कमी झाला”.

ड्रेसिंग रुममध्ये मला पाहून सर्वजण खूश होते. आम्ही पहिलं सराव सत्र खूप चांगल्यारितीने पूर्ण केलं, असंही त्याने सांगितलं. रवी सरांनी मला खेळाचा आनंद घेण्यास सांगितलं. ज्याप्रमाणे रणजी ट्रॉफीत खेळतोस, त्याचप्रमाणे खेळ, असा सल्लाही त्यांनी दिल्याचं पृथ्वीने सांगितलं.

संबंधित बातम्या 

INDvsWI : विंडीजला धूळ चारण्यासाठी भारत सज्ज, पृथ्वीकडे देशाचं लक्ष