नवी दिल्लीः रवी शास्त्री यांनी विराट कोहलीला सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी द्यावी या गोष्टीचं समर्थन केलं आहे. निवड समितीच्या अध्यक्षपदी मी असतो तर विराट कोहलीला कसोटीसोबतच वन-डे आणि टी-20 मध्येही कर्णधार करण्याचा विचार केला असता. शिवाय धोनीला खेळाचा आनंद घेऊ दिला असता, असं शास्त्री यांनी सांगितलं.
कोहलीला कर्णधारपद देण्याची हीच योग्य वेळ
धोनीमध्ये अजून भरपूर क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे. मात्र धोनीने आता खेळाचा आनंद घेतला पाहिजे. कोहलीकडे सध्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्याची क्षमता आहे, त्यामुळं कोहलीकडे कर्णधारपद देण्याची हीच योग्य वेळ आहे, असं शास्त्री इंडिया टुडे या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.
भारतीय संघाचं येत्या 18 महिन्यांचं वेळापत्रक पाहता त्यामध्ये कसोटी सामने जास्त खेळले जाणार आहेत. त्यामुळे 2019 विश्वचषकाच्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. निवडकर्त्यांना हा निर्णय घेणं अवघड असलं तरी संघाच्या हितासाठी तो गरजेचा आहे, असंही शास्त्री म्हणाले.
ऑस्ट्रेलियाकडून शिकण्याची गरज
ऑस्ट्रेलियाचा मार्क टेलर हा यशस्वी कर्णधार होता. मात्र त्यांनी स्टीव्ह वॉ ला कर्णधार बनवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केले. वॉ कर्णधार म्हणून फीट झाल्यानंतर रिकी पाँटींगला तयार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मायकल क्लार्क आणि स्टीव्ह स्मिथच्या बाबतीतही ऑस्ट्रेलियाने तसंच केलं, त्यामुळे भारताच्या निवडकर्त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून शिकण्याची गरज आहे, असं शास्त्री यांनी सांगितलं.