नवी दिल्लीः ऑनलाईल शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणखी एक पाऊल टाकलं आहे. फ्लिपकार्टने आता ग्राहकांसाठी 'नो कॉस्ट ईएमआय' सेवा सुरु केली आहे.
ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यासाठी या सेवेमुळे ग्राहकांना आता कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त शुल्क भरावं लागणार नाही.
ग्राहकांना असा होईल फायदा
ऑनलाईन खरेदीसाठी ग्राहकांना यापूर्वी प्रोसेसिंग शुल्क, डाऊन पेमेंट किंवा वस्तू हफ्त्याने खरेदी करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत होते. मात्र नो कॉस्ट ईएमआय सेवेमुळे ग्राहकांची या सर्व प्रकारच्या शुल्कापासून सुटका होणार आहे.
सामान्य व्यक्तीलाही स्वस्तात खरेदी करता यावी, या दिशेने हे फ्लिपकार्टचं पहिलं पाऊल आहे. या सेवेमुळे अनेक उत्पादन कंपन्यांनी फ्लिपकार्टवर वस्तू उपलब्ध करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे कॅश ऑन डिलिव्हरी सेवेप्रमाणे ही सेवा सुद्धा ऑनलाईन व्यवहार वाढवण्यासाठी मदत करेल, असं फ्लिपकार्टचे अधिकारी मयंक जैन यांनी सांगितलं.
फ्लिपकार्टने या सेवेसाठी बजाज फिनसर्वसह अनेक प्रमुख कंपन्यांशी भागीदारी केली आहे. ही सेवा यापूर्वी ठराविक वस्तूंसाठीच उपलब्ध होती. मात्र, आता सर्व प्रकारच्या खरेदीवर ही सेवा उपलब्ध असणार आहे.
नो कॉस्ट ईएमआय सेवेअतंर्गत हफ्त्याने वस्तू खरेदी केल्यास परताव्याचा कालावधी 3 ते 12 महिन्यापर्यंत असणार आहे.