केपटाऊन : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर फलंदाज शिखर धवन यांचं भांगडा प्रेम पुन्हा एकदा पाहायला मिळालं. यावेळी दोघांनी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये रस्त्यावरच भांगडा केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 जानेवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. केपटाऊनमध्येच उभय संघांमध्येच पहिला कसोटी सामना खेळवण्यात येईल. दरम्यान, घोट्याच्या दुखापतीने त्रस्त असलेला शिखर धवन पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही, याबाबत शंका आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ 3 कसोटी सामने, 6 वन डे आणि 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. भारताने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकही मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे भारताकडे इतिहास रचण्याची संधी आहे.