नवी दिल्ली : व्होडाफोनने नव्या वर्षात ग्राहकांना खास गिफ्ट देण्याची तयारी सुरु केली आहे. जानेवारीपासून व्हॉईस ओव्हर एलटीई म्हणजेच VoLTE ही सेवा लाँच केली जाणार असल्याचं व्होडाफोनने जाहीर केलं आहे.


VoLTE मुळे व्होडाफोनच्या ग्राहकांना एचडी कॉलिंगचा अनुभव घेता येईल. भविष्यातील तंत्रज्ञानाच्या दृष्टीने व्होडाफोन महत्त्वाचं पाऊल टाकत असल्याचं कंपनीचे भारताचे व्यवस्थापकीय संचालक सुनील सूद यांनी म्हटलं आहे.

पहिल्या टप्प्यात मुंबई, दिल्ली, कर्नाटक, गुजरात आणि कोलकात्यातून या सेवेची सुरुवात होईल. त्यामुळे व्होडाफोनच्या ग्राहकांनाही आता एअरटेल आण जिओप्रमाणे एचडी कॉलिंगचा अनुभव घेता येईल.

काय आहे VoLTE सेवा?

भारतात VoLTE सेवा देणारी रिलायन्स सर्वात पहिली कंपनी आहे. जिओने कंपन्यांसमोर तगडं आव्हान उभं केल्यानंतर ग्राहकांना VoLTE सेवा देण्यासाठी इतर कंपन्यांही सरसावल्या आहेत. एअरटेलनेही या सेवेची सुरुवात केली.

VoLTE ही अशी सुविधा आहे, ज्यामुळे डेटाद्वारे व्हॉईस कॉलिंग करता येते. म्हणजेच तुमच्या डेटा पॅकमध्येच तुम्ही कॉलिंगचाही लाभ घेऊ शकता. VoLTE सेवेत ग्राहकांना व्हिडिओ कॉलिंगचीही सुविधा मिळते.

एअरटेलने VoLTE सेवा सुरु केल्यानंतर ही सेवा देणारी एअरटेल जिओनंतर दुसरी कंपनी ठरली. तर व्होडाफोनही लवकरच VoLTE सेवा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात होतं, आता अधिकृतपणे कंपनीनेच यावर स्पष्टीकरण देत वृत्ताला दुजोरा दिला आहे.