मुंबई : पुढील आठवड्यात भारतीय क्रिकेट संघ जगातील सर्वात मोठी क्रिकेट टुर्नामेंट असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला वगळून निवड समितीने दिनेश कार्तिकला संधी दिली आहे. कार्तिकच्या या निवडीबाबत अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. परंतु रिषभला वगळून कार्तिकला संधी का देण्यात आली आहे? याबाबत स्वतः टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने माहिती दिली आहे.


एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहली म्हणाला की, "संघ अडचणीत आलेला असताना, दबावात असताना चांगली खेळी करुन दिनेश कार्तिकने स्वतःला सिद्ध केले आहे. कार्तिककडे अनुभव आहे. देव न करो महेंद्रसिंह धोनीला काही झालं तर कार्तिक यष्टीरक्षक म्हणूनही तितकाच उपयोगी पडणार आहे. एक मॅचफिनिशर म्हणूनही कार्तिकने अनेकदा चांगले प्रदर्शन केले आहे. या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आणि विश्वचषकाचा विचार करुन आम्ही कार्तिकची संघात निवड केली आहे."

खूप काळापासून टीम इंडियाचा भाग असलेल्या दिनेश कार्तिकला अनेकदा संघाच्या आत-बाहेर करावे लागले आहे. परंतु मागील वर्षी आयपीएलमध्ये कार्तिकने खूप चांगले प्रदर्शन केले होते. त्यामुळे कार्तिकला भारतीय संघात स्थान देण्यात आले. मिळालेल्या संधींमध्येदेखील कार्तिकने अनेकदा चांगली फलंदाजी केली आहे. त्यामुळेच निवड समितीने विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात कार्तिकची निवड केली आहे.

मी तर धोनीचा 'फर्स्ट एड किट' : दिनेश कार्तिक

दरम्यान विश्वचषक संघातील निवडीबाबत प्रतिक्रिया देताना कार्तिक म्हणाला की, "महेंद्रसिंह धोनी मैदानावर आहे, तोवर मी संघाबरोबर असणारे एक छोटेसे फर्स्ट एड किट (प्रथमोपचार पेटी) असेन."

कार्तिक म्हणाला की, "माझी विश्वचषकासाठी संघात निवड झाली आहे. याचा मला खूप आनंद आहे. परंतु संघातील माझ्या रोलबाबत मी म्हणेन की, महेंद्रसिंह धोनी मैदानावर खेळतोय तोवर मी संघाबरोबर असणारे एक छोटेसे फर्स्ट एड किट (प्रथमोपचार पेटी) असेन. कोणत्याही कारणामुळे धोनीला एखादा सामना खेळता आला नाही, तर त्याच्या जागी मला संधी मिळेल. त्या एका दिवसासाठी मी संघात बॅन्ड एडची भूमिका निभावेन."