मुंबई : मुंबई महापालिकेच्या पश्‍चिम उपनगरांमधील रिक्त प्रभागांच्या पोटनिवडणुका जाहीर करण्याला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. चार नगरसेवकांचं नगरसेवकपद रद्द झाल्याने दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांनी नगरसेवकपदावर हक्क सांगत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या चार उमेदवारांचं जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. याच पार्श्‍वभूमीवर प्रभाग क्रमांक 76, 32, 81 आणि 28 मध्ये पोटनिवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने सुरु केली आहे.


यासंबंधी एक अधिसूचनाही नुकतीच जारी करण्यात आली आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले उमेदवार नितीन सलाग्रे (काँग्रेस), गीता भंडारी, संदीप नाईक आणि शंकर हुंडारे (सर्व शिवसेना) यांनी हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे.

बीएमसीतील चौघा नगरसेवकांचं पद धोक्यात, दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना संधी

निवडणूक आयोगाने सध्या केवळ मतदारयादी अद्ययावत करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. या प्रभागात अद्याप निवडणुका जाहीर केलेल्या नाहीत. मात्र मतदारयाद्यांची तपासणी झाल्यावर निवडणुका घोषित होण्याची शक्‍यता आहे, असं निवडणूक आयोगाच्या वतीने कोर्टात स्पष्ट करण्यात आलं.

या याचिकेवर सुट्टीकालीन न्यायालयात न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती निझामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या प्रकरणातील काही याचिका अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे आयोग अशाप्रकारे निवडणूक जाहीर होऊ शकत नाही. अशाप्रकारे आकस्मिकपणे निवडणुका जाहीर केल्यास याचिकादारांच्या कोर्टातील प्रलंबित दाव्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असंही याचिकाकर्त्यांच्या वतीने कोर्टाला सांगण्यात आलं. हायकोर्टानं दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर आयोगाला 12 जूनपर्यंत निवडणुका जाहीर करण्यास मनाई केली करत जूनच्या पहिल्या आठवड्यात यावर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत.