कोहलीच्या टीम इंडियाकडे सलग तिसऱ्यांदा कसोटी अजिंक्यपदाची गदा
एबीपी माझा वेब टीम | 01 Apr 2019 11:23 PM (IST)
आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत एक एप्रिलपर्यंत जो संघ पहिल्या स्थानावर असेल त्याला ही गदा दिली जाते. ऑस्ट्रेलियातल्या ऐतिहासिक कसोटी मालिकाविजयानंतर भारताने क्रमवारीतलं अग्रस्थान कायम राखलं होतं.
फाईल फोटो
मुंबई : विराट कोहलीच्या टीम इंडियाने सलग तिसऱ्यांदा आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. यासोबतच भारतीय संघाने अजिंक्यपदाची गदा कायम राखली आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत एक एप्रिलपर्यंत जो संघ पहिल्या स्थानावर असेल त्याला ही गदा दिली जाते. ऑस्ट्रेलियातल्या ऐतिहासिक कसोटी मालिकाविजयानंतर भारताने क्रमवारीतलं अग्रस्थान कायम राखलं होतं. या क्रमवारीत न्यूझीलंड दुसऱ्या स्थानी आहे. या गदेसोबतच भारताला एक दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचं बक्षिसही मिळणार आहे. कसोटी अजिंक्यपदाची गदा सलग तिसऱ्यांदा पटकावणं ही टीम इंडियासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं कर्णधार विराट कोहलीने म्हटलं आहे. 'टीम इंडिया सर्वच फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी बजावत आहे. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी येणं अभिमानास्पद आहे. कसोटी क्रिकेटचं महत्त्व आम्हाला माहित आहे. जे सर्वोत्तम आहेत, तेच या प्रकारात अग्रक्रमावर येतात' असंही कोहली म्हणाला.