मुंबई : परदेश दौऱ्यादरम्यान खेळाडूंना पत्नींसोबत राहण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआयकडे केली आहे. सध्याच्या धोरणानुसार परदेश दौऱ्यात खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ दोन आठवड्यांपर्यंत पत्नीसोबत राहू शकतात.
कोहलीने याबाबत बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच यासंदर्भात क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनाही कल्पना देण्यात आलेली आहे.
विराटच्या विनंतीनंतर, क्रिकेट प्रशासकीय समितीने भारतीय संघाचे सध्याचे व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांना समितीकडे अधिकृतरित्या पत्र लिहण्याची मागणी केली आहे. मात्र याबाबत तात्काळ कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. त्यामुळे बीसीसीआय यावर काय निर्णय घेणार याकडे खेळाडूंचं लक्ष लागलं आहे.
काही आठवड्यांपूर्ण ही विनंती करण्यात आली होती. मात्र बीसीसीआयच्या धोरणानुसार याबाबत व्यवस्थापकांना अधिकृत विनंती करावी लागणार आहे, त्यानंतर यावर निर्णय घेतला जाणार आहे. अनेक क्रिकेटर्सच्या पत्नी त्यांच्यासोबत असतात. त्यामुळे खेळाडूंना पत्नी खेळाडूंसोबतच राहता यावं असं विराटला वाटतं.
परदेश दौऱ्यात पत्नी किंवा गर्लफ्रेन्ड्स यांना सोबत नेण्याबाबत देशांचे वेगवेगळे नियम आहेत. मात्र बहुतेक संघामध्ये खेळाडूंसोबत फॅमिलीला पाठवण्यास परवानगी नाही.