मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं आयसीसी क्रमवारीत ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठीच्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान कायम राखलं आहे. इंग्लंडला लोळवल्यानंतर टीम इंडियानेही टी20 संघांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाचा अॅरॉन फिन्च हा टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असून, विराटच्या खात्यात फिन्चपेक्षा 28 गुण अधिक आहेत. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. के एल राहुलने 15 व्या स्थानावर मजल मारली आहे.

भारताचा कर्णधार कोहली कसोटी फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या, तर वन डे सामन्यांसाठीच्या फलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट्समध्ये पहिल्या पाचात स्थान मिळवणारा तो एकमेव भारतीय फलंदाज ठरला आहे.

टी 20 गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याला इम्रान ताहिरपेक्षा फक्त चार गुण कमी आहेत. रविचंद्रन अश्विन आठव्या, तर आशिष नेहरा 24 व्या स्थानावर आहे.

इंग्लंडवर मिळवलेल्या 2-1 अशा विजयाच्या निकषावर भारतीय संघ ट्वेन्टी ट्वेन्टीच्या आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर दाखल झाला आहे.

तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पणातच मालिका खिशात, नाम है कोहली!


तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करत असतानाच्या मालिकेतच विजय मिळवण्याचा मान विराट कोहलीला मिळाला आहे. हा पराक्रम गाजवणारा कोहली हा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे.