आता डाव्यांमध्ये घराणेशाही, आडम मास्तरांकडून पत्नी, मुलीला उमेदवारी
एबीपी माझा वेब टीम | 02 Feb 2017 05:59 PM (IST)
सोलापूर : डाव्या विचारधारेचे पक्ष नेहमीच घराणेशाहीच्या राजकारणावर हल्ला चढवत असतात. काँग्रेस असो भाजप असो वा शिवसेना, सर्वच पक्षांना डाव्यांनी कायम धारेवर धरलेलं आपण पाहिलं आहे. विशेष म्हणजे डावे घराणेशाहीपासून चार हात लांब होते. त्यामुळे घराणेशाहीच्या राजकारणावर टीका करण्याचा अधिकारही त्यांना होता, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. मात्र, आता डाव्यांनी घराणेशाहीचा मार्ग अवलंबला आहे की काय, असा प्रश्न पडला आहे. सोलापुरातील ज्येष्ठ माकप नेते नरसय्या आडम यांनी पत्नी आणि मुलीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवून डाव्यांमधील घराणेशाही असा नवा मुद्दाच चर्चेला आणला आहे. नरसय्या आडमकामगार वर्गावर चांगली पकड असलेले नेते माकपने मनपा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली. 24 जणांच्या पहिल्या यादीत नरसय्या आडाम यांच्या पत्नी आणि मुलीचंही नाव आहे. उमेदवारी देताना त्यांच्या कार्याचा विचार झाल्याचं आडाम यांनी म्हटलं आहे. तीन वेळा नगरसेवक आणि तीन वेळा आमदार राहिलेल्या आडम मास्तरांची कामगार वर्गावर चांगली पकड आहे. कामगार आणि गोरगरीब जनतेचा तळागाळातील तत्वनिष्ठ नेता म्हणूनही आडम मास्तरांची ओळख आहे. कामिनी आडमपत्नीला उमेदवारी कामिनी आडम या सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातून 30 वर्षांची सेवा करुन निवृत्त झाल्या आहेत. आरोग्य सहाय्यक म्हणून त्यांनी मनपा दवाखान्यात सेवा बजावली. मात्र, एवढीच त्यांची ओळख नाही. महाराष्ट्रातल्या कामगार विश्वात ज्याचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं, ते कामगार नेते नरसय्या आडम यांच्या त्या पत्नी आहेत. आता त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. प्रभाग 13 मधून त्या माकपच्या तिकिटावर लढणार आहेत. अरुणा आडामकन्येला उमेदवारी अरुणा आडम या गेली 10 वर्षे त्या मिनाक्षीताई साने विडी कामगार घरकुल योजनेच्या कार्यालयात त्या सेवेत आहेत. कामगार वर्गाच्या प्रश्नासाठी नेहमीच त्या अग्रेसर राहिल्या आहेत. माजी आमदार नरसय्या आडम यांच्या त्या कन्या आहेत. प्रभाग क्रमांक 9 मधून त्यांना माकपाने उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसकडून घराणेशाहीची टीका घरातल्या दोन जणांना उमेदवारी दिल्याने नरसय्या आडम टीकेचे धनी बनले आहेत. माकपचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. शिवाय, निवडणुकीच्या प्रचारातही आडाम मास्तरांवर काँग्रेस याच मुद्द्यावर टीका करणार असल्याचे दिसते आहे. 2009 साली प्रणिती शिंदे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तेव्हा माकपने घराणेशाहीच्या मुद्द्यावरून प्रचारात रान उठवलं होतं. सुशीलकुमार शिंदे यांच्यावर मुलीला उमेदवारी दिल्याने टीका झाली. आता स्वतः नरसय्या आडम यांनी पत्नी आणि मुलीला उमेदवारी देऊन काँग्रेसचा रोष ओढवून घेतला आहे. स्पेशल रिपोर्ट :