नागपूर : नागपूरमध्येही उमेदवारांच्या यादीसाठी गडकरी वाड्यावर बैठक झाली. तीन तास झालेल्या बैठकीमध्येही नागपूरमधील भाजपची यादी फायनल होऊ शकली नाही. नागपुरातील उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी रात्री पुन्हा भाजप नेत्यांची बैठक
होणार आहे.
दुपारी गडकरी वाड्यावर झालेल्या बैठकीला केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नागपूरमधील सर्व आमदार उपस्थित होते. रात्री होणाऱ्या बैठकीला मात्र मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे नागपूरमधील उमेदवारांची यादी मुख्यमंत्र्यांशिवाय फायनल होणार का हा प्रश्न पडला आहे.
शिवसेनेसोबत काडीमोड झाल्यानंतर दहाही महापालिकांमध्ये निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी भाजपची तयारी सुरु आहे. उमेदवार यादी लांबल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. 21 तारखेला नागपूरसह सर्व महापालिकांसाठी मतदान होणार असून 23 तारखेला मतमोजणी होणार आहे.