बर्मिंगहॅम : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये बांगलादेशवर 9 विकेट्सने मात करुन टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली. फायनलमध्ये रविवारी भारताचा मुकाबला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.


पाकिस्तानविरुद्धचा सामना इतर सामन्यांप्रमाणेच असेल, भारतीय संघाची हीच रणनिती असेल, असं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटलं आहे.

भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांना दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. मात्र हा आमच्यासाठी फार चिंतेचा विषय नाही. सराव सत्रात प्रत्येक फलंदाज चांगली फलंदाजी करतो, असंही विराटने सांगितलं.

बांगलादेशविरुद्धचा विजय हा चांगल्या खेळाचं उदाहरण आहे. टीम इंडियाला अशाच विजयाची गरज होती. 9 विकेट्स राखून विजय मिळवला. एवढ्या मोठ्या विजयाची अपेक्षा नव्हती. मात्र भारताची फलंदाजी किती मजबूत आहे, हे यातून दिसून आलं, असं विराट म्हणाला.

‘’केदार जाधव चलाख खेळाडू’’

बांगलादेशच्या फलंदाजीची सुरुवात पाहता धावसंख्या 300 धावांच्या आसपास जाईल असं वाटत होतं. मात्र केदार जाधवने दोन विकेट घेऊन बांगलादेशच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. मात्र केदार जाधव आमच्यासाठी सरप्राईज पॅकेज नाही. तो एक चलाख खेळाडू आहे. कोणत्या परिस्थितीत कशी गोलंदाजी करायची आणि कशी मदत मिळेल, हे त्याला चांगलं माहित आहे. बांगलादेशने 300 धावांचं लक्ष्य दिलं असतं, असं विराट म्हणाला.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने 9 विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात बांगलादेशच्या फलंदाजी रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. यामध्ये केदार जाधवने महत्वाची भूमिका निभावली. दोन विकेट्स घेऊन त्याने बांगलादेशचे महत्वाचे दोन फलंदाज माघारी पाठवले.