थिरुवनंतपुरम : माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला ट्वेण्टी-20 मालिकेतून वगळण्यात आपला हात नसल्याचं स्पष्टीकरण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिलं आहे. हा निर्णय सर्वस्वी निवड समितीचा असल्याचंही कोहलीने म्हटलं आहे. विंडीजविरुद्धच्या मालिका विजयानंतर कोहली पत्रकारांशी बोलत होता.


एम एस धोनीला वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून वगळल्यानंतर क्रीडा विश्वात आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं. धोनीच्या चाहत्यांनीही निवड समितीवर सडकून टीका केली होती.

रिषभ पंतला संधी देण्यासाठी धोनीने स्वत:ला आगामी ट्वेण्टी20 मालिकेतून बाहेर राहण्याचा निर्णय घेतल्याचं विराट कोहलीने सांगितलं.

पत्रकारांशी बोलताना कोहली म्हणाला की, "निवडकर्त्यांनी आधीच ही बाब स्पष्ट केली आहे. पहिली गोष्ट...त्यांच्याशी बोलून झालं आहे. त्यामुळे इथे बसून हे सगळं समजावण्यासाठी माझ्याकडे कोणतंही कारण नाही. मला वाटतंय की, जे काही झालं ते निवडकर्त्यांनी सांगितलं आहे."

कोहली पुढे म्हणाला की, "मी या चर्चेचा भाग नव्हतो. त्यामुळे निवडकर्त्यांनी जे सांगितलं, तेच झालं होतं. असं काही नसतानाही लोक यावर जास्तच विचार करत असल्याचं मला वाटत आहे. मी आश्वासन देतो की, तो आताही संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. टी20 फॉरमॅटमध्ये रिषभसारख्या खेळाडूंना आणखी संधी द्यायला हवी, असं मला वाटतं."