नवी दिल्ली : भारताची बॉक्सर मेरी कोम आणि केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पाचवेळा जग्गजेती ठरलेली  मेरी कोम आणि राज्यवर्धन राठोड बॉक्सिंग खेळताना दिसत आहेत. स्वत: मेरी कोमने हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.


जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचं दुसऱ्यांदा भारतात आयोजन होत आहे. मेरी कोमही या स्पर्धेत सहभागी होणार असून तिने तयारीला सुरुवात केली. यावेळी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये या दोघांमध्ये हा मैत्रीपूर्ण सामना रंगला होता. व्हिडीओत मेरी कोम राज्यवर्धन राठोड यांना पंच मारण्याचा प्रयत्न करत असून, राठोड तिच्या पंचपासून वाचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

15 नोव्हेंपासून या चॅम्पियनशिपला सुरुवात होत असून सगळे बॉक्सर स्पर्धेसाठी तयारी करत आहेत. खेळांडूना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा मंत्री स्वत: रिंगपर्यंत पोहोचले. यावेळी त्यांच्यात बॉक्सिंगचा छोटा पण मैत्रीपूर्ण सामना रंगला.

व्हिडीओ शेअर करताना मेरीने लिहिलं आहे की, "विश्वास बसत नाही. सगळ्या खेळाडूंना प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्यासाठी माननीय क्रीडा मंत्र्यांचे आभार."


दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये 15 ते 24 नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. मेरी या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवण्यासाठी उद्देशानेच उतरेल. मेरी या चॅम्पियनशिपची ब्रॅण्ड अॅम्बेसेडरही आहे.