लंडन : टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या बोचऱ्या पराभवातून सावरून, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात बाऊन्स बॅक कसं केलं, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला विराट कोहलीकडून हवं असेल तर ऐका.
विराट म्हणतो... तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून कामगिरी काढून घ्यायची असेल, तर जे काही वाटतं ते प्रामाणिकपणे त्यांच्या तोंडावर सांगावं लागतं. ते दुखावतील म्हणून बोलण्याचं टाळायचं नसतं.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 322 धावांचं लक्ष्य उभारूनही टीम इंडियाला स्वीकारावा लागलेला पराभव विराट कोहलीला सहन झाला नव्हता. त्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर कठोर आत्मपरिक्षणाची गरज होती, असं विराट म्हणाला.
त्या आत्मपरिक्षणात कर्णधार या नात्याने तुम्हाला प्रामाणिकपणे बोलायचं असतं. आपण स्पष्ट बोललो तर समोरचा सहकारी दुखावला जाईल याची तुम्हाला पर्वा करायची नसते. आपण कुठं चुकलो याचं साऱ्यांच्या साक्षीने तुम्हाला पोस्टमॉर्टेम करायचं असतं. तुम्ही चुकला असाल तर तुमच्या चुकीचीही कबुली द्यायची असते. तुमची रोखठोक मतं सहकाऱ्यांना पटवून दिलीत तरच तुमच्या संघाची रूळावरून घसरलेली गाडी पूर्वपदावर येऊ शकते, असं विराटने सांगितलं.
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट्सने मात करुन आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात धडक मारली आहे. श्रीलंकेकडून झालेल्या पराभवातून धडा घेत टीम इंडियाने या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली.